कुणाल कामरा, सुषमा अंधारे हक्कभंग समितीसमोर हाजीर; तक्रारदारच गैरहजर; १० मार्चला होणार सुनावणी

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर विंडबनात्मक गाणे सादर करून नवा वाद ओढवून घेणारे स्टॅण्डअप कॉमेडियन कुणाल कामरा आणि तेच गाणे त्याच चालीवर बोलून दाखविणाऱ्या शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे मंगळवारी विधिमंडळाच्या हक्कभंग समितीसमोर हजर राहिले.
कुणाल कामरा, सुषमा अंधारे हक्कभंग समितीसमोर हाजीर; तक्रारदारच गैरहजर; १० मार्चला होणार सुनावणी
(संग्रहित छायाचित्र)
Published on

मुंबई : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर विंडबनात्मक गाणे सादर करून नवा वाद ओढवून घेणारे स्टॅण्डअप कॉमेडियन कुणाल कामरा आणि तेच गाणे त्याच चालीवर बोलून दाखविणाऱ्या शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे मंगळवारी विधिमंडळाच्या हक्कभंग समितीसमोर हजर राहिले. मात्र, मूळ तक्रारदार, भाजप नेते प्रवीण दरेकर गैरहजर राहिल्याने ही सुनावणी पुढे ढकलण्यात आली. आता या प्रकरणाची सुनावणी १० मार्च २०२६ रोजी होणार आहे.

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर अप्रत्यक्ष टीका करणारा कुणाल कामरा आणि सुषमा अंधारे यांच्याविरोधात गेल्यावर्षी अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी विधान परिषदेत भाजपचे गटनेते प्रवीण दरेकर यांनी हक्कभंग प्रस्ताव मांडला होता. सभापती राम शिंदे यांनी हक्कभंगाची सूचना दाखल करून घेत पुढील कारवाईसाठी विशेषाधिकार समितीकडे पाठवित असल्याचे घोषित केले होते. त्यानुसार समितीने कामरा आणि अंधारे यांना नोटीस पाठवून चौकशीसाठी उपस्थित राहण्याबाबत निर्देश दिले होते. त्यानुसार हे दोघेही मंगळवारी हक्कभंग समितीसमोर हजर झाले. मात्र, तक्रारदार दरेकर हे गैरहजर राहिल्याने या प्रकरणाची सुनावणी आता १० मार्च रोजी ठेवण्यात आली आहे. या दिवशी तक्रारदार आणि ज्यांच्यावर आरोप आहेत, अशा दोघांचीही समोरासमोर साक्ष नोंदविली जाणार आहे.

तक्रारदार नव्हते तर तसे सांगायला हवे होते - अंधारे

कुणाल कामरा आणि मी दोघेही समितीसमोर साक्ष नोंदवण्यासाठी आलो होतो. पण मूळ तक्रारदार प्रवीण दरेकर हे महाराष्ट्राबाहेर असल्याने समितीसमोर येऊ शकले नाहीत. जर मूळ तक्रारदारच आज नव्हते तर त्यांनी आम्हाला तसे सांगायला हवे होते, आम्ही आलो नसतो. पण आजच्या सुनावणीत काहीही झाले नाही, असे ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी सांगितले.

कामराचा लक्षवेधक टी-शर्ट

या प्रकरणानंतर तब्बल वर्षभरानंतर कुणाल कामरा मुंबईत दाखल झाला होता. हक्कभंग समितीसमोर सुनावणीसाठी आलेल्या कामराने परिधान केलेल्या टी-शर्टने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. टी-शर्टच्या दर्शनी भागावर संविधानाच्या पुस्तकाचे चित्र छापलेले होते. या टी-शर्टची राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा रंगली होती. दरम्यान, “सध्या मी मुंबईत सुरक्षित आहे. आज सुनावणीला हजर राहिलो होतो, पण सुनावणी होऊ शकली नाही. मी १० तारखेला परत येणार आहे, तेव्हा समितीच्या लोकांसमोर आपली बाजू मांडणार आहे. बॅकफूटला न जाता यानंतरही मी स्टँडअप कॉमेडीचे शो करत राहणार आहे. मी संविधानाला मानतो. माझ्यावर जे आरोप ठेवले आहेत, त्यावर मी योग्य उत्तर देईन,” असे कामरा याने सांगितले.

logo
marathi.freepressjournal.in