
मुंबई : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर विडंबनात्मक गीत गाणारा स्टॅन्ड अप कॉमेडीयन कुणाल कामराचा व्हिडिओ संरक्षित म्हणून घोषित करा, अशी मागणी करणाऱ्या जनहित याचिकेत हस्तक्षेप करण्यास उच्च न्यायालयाने बुधवारी नकार दिला. कामराचा व्हिडिओ शेअर तसेच रिट्विट करणाऱ्या लोकांवर फौजदारी कारवाई करण्यापासून पोलिसांना रोखण्याची मागणी याचिकेतून केली होती. तथापि सरकारने अशाप्रकारे एकाही व्यक्तीवर कारवाई केलेली नाही, असे निरीक्षण मुख्य न्यायमूर्ती आलोक आराधे आणि न्यायमूर्ती मकरंद कर्णिक यांच्या खंडपीठाने नोंदवले. तसेच पोलिसांनी फौजदारी कारवाईचा बडगा उगारला तर याचिकाकर्त्याला दाद मागण्याची मुभा देत याचिका निकाली काढली.
शिंदे यांच्यावरील विडंबनात्मक गीत सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर कामरा विरुद्ध कारवाई सुरू केली आहे. कामराला मद्रास उच्च न्यायालयाने अटकेपासून संरक्षण दिलेले आहे. याचदरम्यान विधी शिक्षण घेणाऱ्या हर्षवर्धन खांडेकर या विद्यार्थ्याने मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली. या याचिकेवर बुधवारी सुनावणी झाली. यावेळी राज्य सरकारच्या वतीने मुख्य सरकारी वकील ॲड. हितेन वेणेगावकर यांनी याचिकेलाच आक्षेप घेतला. कामराचा व्हिडिओ शेअर केल्याबद्दल सरकारने आजपर्यंत कोणाही व्यक्तीविरुद्ध कारवाई केलेली नाही, अशी माहिती ॲड. वेणेगावकर यांनी खंडपीठाला दिली.
न्यायालयाने सरकारचा युक्तिवाद ग्राह्य धरला
याचिकाकर्त्या खांडेकर या विद्यार्थ्यातर्फे ॲड. अमित कटारनवरे यांनी युक्तिवाद केला. राज्य सरकार अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या बाबतीत भेदभावाची भूमिका घेत आहे. अनेक राजकारणी भडकाऊ भाषणे देतात. त्यांच्यावर सरकारने कधीच कारवाई केलेली नाही. मात्र कुणाल कामराने एक विडंबनात्मक गीत गायले म्हणून त्याच्याविरुद्ध कारवाई सुरू करण्यात आली आहे. सरकारची ही भूमिका पक्षपाती स्वरूपाची आहे. कुणाल कामराचा व्हिडिओ अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या अधिकारांतर्गत संरक्षित व्हिडिओ म्हणून घोषित करण्यात यावा, अशी विनंती अॅ्ड. कटारनवरे यांनी केली. दोन्ही बाजू ऐकून घेतल्यानंतर खंडपीठाने सरकारचा युक्तिवाद ग्राह्य धरला आणि विधी शाखेतील याचिकाकर्त्याची याचिका निकाली काढली.
कामराकडे उत्तर मागू - मुरजी पटेल
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि शिवसेना प्रमुख एकनाथ शिंदे यांच्यावर "गद्दार" अशी अप्रत्यक्ष टिप्पणी करणारे कॉमेडियन कुणाल कमरा जेव्हा मुंबईत येतील, तेव्हा त्याच्याकडून उत्तर मागण्यात येईल, असे शिवसेना आमदार मुरजी पटेल यांनी सांगितले. आमदार पटेल यांच्या तक्रारीवरून मुंबई पोलिसांनी स्टँड-अप कॉमेडियन कमरा यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. कामरा राज्यात येणे टाळत असल्याचे पटेल यांना पत्रकारांशी बोलताना सांगितले. "पोलिसांनी समन्स बजावल्यानंतरही कामरा मुंबईत आलेला नाही. आज नाही तर उद्या त्याला पोलिसांसमोर यावेच लागेल," असेही आमदारांनी सांगितले.