Kunal Kamra vs Shiv Sena : एकनाथ शिंदेंवरील 'त्या' गाण्यावरुन वातावरण तापलं, सेटची तोडफोड, FIR दाखल

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावरील एक गाणं आपल्या स्टँड-अप कॉमेडी शोमध्ये सादर केल्यामुळे कॉमेडियन कुणाल कामरा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. याप्रकरणी राज्यातील वातावरण चांगलंच तापलं असून शिवसेना आक्रमक झाली आहे.
Kunal Kamra vs Shiv Sena : एकनाथ शिंदेंवरील 'त्या' गाण्यावरुन वातावरण तापलं, सेटची तोडफोड, FIR दाखल
Published on

राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावरील एक गाणं आपल्या स्टँड-अप कॉमेडी शोमध्ये सादर केल्यामुळे कॉमेडियन कुणाल कामरा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. याप्रकरणी राज्यातील वातावरण चांगलंच तापलं असून शिवसेना आक्रमक झाली आहे. शिवसैनिकांनी मुंबईतील ज्या ठिकाणी कामराच्या शोचं चित्रिकरण झालं त्या सेटची तोडफोड केली. कामराविरोधात एफआयआर देखील दाखल करण्यात आला आहे.

माहितीनुसार, कुणाल कामराने त्याच्या स्टँड-अप शोमध्ये "दिल तो पागल है" सिनेमामधील 'मेरी नजर से तुम देखो तो' हे लोकप्रिय गाणे काही बदल करुन गायले. यामध्ये 'मेरी नजर से तुम देखो तो गद्दार नजर वो आये' असे म्हटले होते. याद्वारे त्याने अलीकडच्या काही वर्षांत महाराष्ट्राच्या राजकारणात घडलेल्या घडामोडींचे (ज्यात शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधील पक्षातील फुटींचा समावेश होता) विनोदी शैलीत वर्णन केले. याच गाण्यात त्याने शिंदे यांचे थेट नाव न घेता त्यांचा उल्लेख 'गद्दार' असा केला. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होताच शिवसेना आक्रमक झाली आणि रविवारी खार परिसरातील स्टूडिओ आणि यूनिकॉन्टिनेंटल होटेलमध्ये तोडफोड केली.

जिथे दिसेल तिथे तोंड काळं करणार -

शिवसेनेचे आमदार मुरजी पटेल यांनी कामराविरुद्ध एफआयआर दाखल केला असून दोन दिवसांत माफी मागण्याचा अल्टिमेटम दिला आहे. माफी न मागितल्यास कामरा जिथे दिसेल तिथे त्याचे तोंडावर काळे फासले जाईल. आम्ही हा मुद्दा विधानसभेत उपस्थित करू आणि राज्याच्या गृहमंत्र्यांना त्याच्याविरुद्ध लवकरात लवकर कारवाई करण्याचे आदेश देण्याची विनंती करू.

महाराष्ट्रात फिरू देणार नाही

"कुणाल कामरा हा भाड्याने घेतलेला विनोदी कलाकार आहे आणि तो काही पैशांसाठी आमच्या नेत्यावर भाष्य करत आहे. महाराष्ट्र तर सोडाच, कुणाल कामरा भारतात कुठेही मुक्तपणे फिरू शकणार नाही; शिवसैनिक त्याला त्याची जागा दाखवून देतील. संजय राऊत आणि शिवसेना (उबाठा) बद्दल आम्हाला वाईट वाटते की त्यांच्याकडे आमच्या नेत्यांवर भाष्य करण्यासाठी कोणतेही पक्ष कार्यकर्ते किंवा नेते शिल्लक नाहीत, म्हणूनच ते त्याच्या (कुणाल कामरा) सारख्या लोकांना या कामासाठी नियुक्त करत आहेत," असे शिवसेनेचे नेते नरेश म्हस्के म्हणाले.

विरोधकांकडून समर्थन

विरोधी पक्ष, विशेषतः शिवसेना (उबाठा) ने कामराचे समर्थन केले आणि हल्ल्याचा निषेध केला. आदित्य ठाकरे यांनी या तोडफोडीला "मिंधेंच्या टोळीने" केलेले भ्याड कृत्य म्हटले आणि राज्याच्या कायदा आणि सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. एखाद्या गाण्यावर फक्त जो असुरक्षित आणि भित्रा असेल तोच प्रतिक्रिया देईल, असेही ते म्हणाले. शिवसेना खासदार संजय राऊत यांनी कामराचा व्हिडिओ शेअर केला आणि "कुणाल की कमाल" असे कॅप्शन वापरले. तर प्रियंका चतुर्वेदी यांनी 'मी कुणालशी अनेक वेळा असहमत असते आणि त्याला ते माहित आहे पण हिंसेचे समर्थन करणे हे लाजिरवाणे आहे' असे म्हणत तोडफोडीच्या घटनेवर टीका केली आहे. तसेच, तोडफोडीचा व्हिडिओ शेअर करीत गृहमंत्री फडणवीसजींना त्यांच्या युतीतील भागीदाराचा अभिमान असला पाहिजे, अशी खोचक पोस्ट केली आहे.

दरम्यान, सेटची तोडफोड केल्याबद्दल शिवसेना युवा सेनेचे सरचिटणीस राहुल कनाल आणि इतर १९ जणांविरुद्ध विविध कलमांखाली एफआयआर दाखल करण्यात आला आहे.

logo
marathi.freepressjournal.in