मुंबई : मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी राज्य सरकारने २ सप्टेंबर रोजी काढलेल्या जीआरला कुणबी समाजाचा तीव्र विरोध आहे. मराठ्यांना कुणबी जातीचे दाखले देणे तातडीने बंद करावे, अशी मागणी कुणबी समाजन्नोती संघटनेने केली आहे. जीआर तातडीने रद्द करण्यात यावा, अन्यथा ९ ऑक्टोबर रोजी मुंबईत विराट मोर्चा काढण्यात येईल, असा इशारा कुणबी समाजोन्नती संघटनेचे अध्यक्ष अनिल नवगणे यांनी पत्रकार परिषदेत दिला.
सरकारने हैदराबाद गॅझेटच्या आधारे मराठा-कुणबी व कुणबी-मराठा अशा नोंदींवरून जात प्रमाणपत्रे देण्यास सुरुवात केली आहे. मात्र यामुळे ओबीसींच्या आरक्षणावर गदा येत असल्याचा आरोप नवगणे यांनी केला. मराठा समाज आर्थिकदृष्ट्या सक्षम असूनही, आमच्या मागासलेल्या समाजाच्या वाट्याला आलेल्या आरक्षणावर डल्ला मारला जात आहे, असे ते म्हणाले.