छत्रपती संभाजीनगर : मराठा समाजाला दिलेले आरक्षण घटनेच्या चौकटीत बसत नाही म्हणून सर्वोच्च न्यायालयाने ते रद्द केले आहे. तरीही मराठा समाजाला आरक्षण देण्यास कुणबी समाजाचा विरोध नाही, असे मत कुणबी सेनेचे महाराष्ट्र प्रमुख विश्वनाथ पाटील यांनी व्यक्त केले आहे. मनोज जरांगे-पाटील हे सरकारवर दबाव टाकून राज्यात कायदा-सुव्यवस्थेची स्थिती निर्माण करत आहेत. त्यांना पोलिसांनी तत्काळ अटक करावी. त्यांच्या सनदशीर आणि लोकशाही मार्गाने सुरू असलेल्या आंदोलनाला आमचा विरोध नाही, असेही विश्वनाथ पाटील यांनी स्पष्ट केले आहे.
विश्वनाथ पाटील म्हणाले की, मराठा समाजाला आरक्षण देण्यास कुणबी समाजाचा विरोध नाही; ही भूमिका आम्ही वेळोवेळी स्पष्ट केली आहे. मात्र, मराठा समजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण दिल्यास ओबीसीमध्ये असलेल्या ३७० च्यावर जातींवर हा अन्याय असेल. शासन मनोज जरांगे यांचे उपोषण सदनशीर मार्गाने उठवण्याचा प्रयत्न करत असताना जरांगे आडमुठेपणाची भूमिका घेत आहेत. मराठा आरक्षणासंदर्भात शासनाने समिती नेमलेली असताना घाईने जीआर काढणे, हा ओबीसी आणि कुणबी समाजावर अन्याय आहे. पोलीस कारवाई करून महाराष्ट्रात निर्माण झालेला तणाव दूर करण्याची आम्ही विनंती करत असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.