नांदेड : मराठा समाजाला कुणबी जातीमध्ये सहभाग करून घेण्यात यावा, या मागणीसाठी जालना जिल्ह्तील अंतरगाव सराटी येथे सुरू झालेल्या आंदोलनाचा वणवा महाराष्ट्रभर पसरला आहे. आंदोलनाची दखल शासन स्तरावर घेवून मोठ्या प्रमाणात हालचाली सुरू झाल्या असून, मिळालेल्या माहितीनुसार मराठवाड्यात ३३ लाख ३१ हजार कुणबी मराठा समाज असून, त्यात नांदेड जिल्ह्यात सुमारे ८७ हजारांची नोंद आहे.
मागील ५ वर्षाच्या काळात मराठवाड्यात ६३२ पैकी ६११ कुणबी मराठा समाजाचे अर्ज मंजूर करण्यात आले. यामध्ये हिंगोली ०, औरंगाबाद- ३९५, नांदेड ९०, बीड - ७३, धाराशिव ०७, जालना ४२, परभणी १२, लातूर - २ अर्जाचा समावेश आहे. मागील १५ दिवसात नांदेड जिल्ह्यात जवळपास २ लाख अभिलेखे (१९७० नंतरची) तपासण्यात आली. पैकी ८७ हजार कुणबी मराठा समाजाच्या नोंदी आढळल्याची माहिती अधिकृत सूत्रांनी दिली. अभिलेख तपासणीत जन्म मृत्यू, रजिस्टर नोंदणी, कोतवाल यांच्याकडील नोंदी, शैक्षनिक कागदपत्रांची तपासणी करण्यात आली.
जालना जिल्ह्यातील अंतरवाला सराटी येथे मनोज जरांगे पाटील यांनी मागील ११ दिवसापासून उपोषण सुरू केले आहे. या उपोषणाची दखल घेवून शासनाने मराठा समाजाला कुणबी जातीत समावेश करण्याबाबतच्या हालचाली सुरू केल्या असून, तसे शासन आदेशही जारी केले आहेत. याउपर शासनाने निवृत्त न्यायमूर्ती संदीप शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली एका समितीचे गठण केले. या समितीला महिनाभरात अहवाल देण्याच्या सूचना शासनाने केल्या आहेत. उपरोक्त सर्व माहिती समितीला दिली जाणार असल्याचेही सूत्रांनी स्पष्ट केले आहे.
इतिहासावर थोडी नजर टाकली असता, मुळात इंग्रज मराठवाड्यात आलेच नव्हते. त्याकाळी मराठवाडा भाग निजामाच्या ताब्यात होता. अनेकांच्या आंदोलनानंतर १९५५ च्या आसपास मराठवाडा निजामाच्या ताब्यातून मुक्त झाला, त्याकाळी कोणत्याही दस्तएवजाची नोंद झाली नाही किंबहुना निजामानी करू दिली नाही, त्यामुळे अनेकजण विविध सोयी सुविधापासून वंचित राहिले, त्याचा परिणाम आज दिसून येत आहे.
महाराष्ट्रीय ज्ञानकोश खंड ११ पुणे अनुसार ३१ टक्के मराठा समाज महाराष्ट्रात १९६१ च्या अगोदर होता. १० लाख ४८ हजार ५०८ मराठवाड्यातील समाजाची संख्या होती.
नांदेड जिल्ह्यात ८७ हजारांची नोंद
नांदेड जिल्ह्यात कुणबी समाजाची लोकसंख्या ७ हजार ४९५ होती, त्यात ४ हजार १ पुरुष, तर ३ हजार ४९४ महिला होत्या. कुणबी ही शेती करणारी जात आहे. या शब्दाची उत्पत्ती कृषिवल किंवा कुटुंबीयांना संस्कृत शब्दापासून झाली असावी. एकाच ठिकाणी घर करून राहून शेतीचा व्यवसाय व पशुपालन करणाऱ्या सामाजिक गटाला उद्देशून हा शब्द वापरला जातो. व्यापक अर्थाने कुणबी हा परंपरेने शेतीचा व्यवसाय करणाऱ्या विविध जाती गटांना उद्देशून हा शब्द वापरला जातो. मराठा व कुणबी यांच्या फारसा फरक नाही. कुणबी जातीत दैवक पद्धत आहे. कुणबी जातीत मराठा, कोकणी, खान्देशी, गुजर असे प्रमुख प्रादेशिक गट आहेत. दुसरीकडे १९३१ चे जनगणेनुसार नांदेड जिल्ह्यात मराठा समाजाची एकूण लोकसंख्या १ लाख ८३ हजार ४५६ होती. त्यात ९६ हजार ४४२ महिला, तर ८७ हजार १४ पुरुष होते. या जातीचे अस्सल मराठा, कुणबी आणि इतर असे तीन वर्ग आहेत.
मराठ्याची कुळे हीच त्यांची आडनावे
अस्सल मराठा स्वत:ला क्षत्रिय मानतात. राजे, सरदार, जमीनदार व लढवय्ये लोक या वर्गात मोडतात. कुणबी म्हणजे शेतकरी मराठे यांनाच कुळवाडी असे म्हणतात. तिसऱ्या वर्गात गवंडी, भंडारी, कुंभार, लोहार, माळी, न्हावी, परीट, सुतार, तेली आदी पोटजातींचा अंतर्भाव होतो. अस्सल मराठा समाज राजपूत वंशाचे असून, त्यांच्या सूर्य, सोम, ब्रम्ह, शेष अशा चार शाखा आहेत. त्यांच्यात ९६ कूळ आहेत. जिल्ह्यात चव्हाण, जाधव, भोसले, दळवी, गायकवाड, जगताप, काळे, क्षीरसागर, मोहिते, निबाळकर, थोरात, शिंदे, पवार, देशमुख, मंगनाळे, पाटील, धुमाळ, केशवे, वडजे, बोकारे, गोमासे, घोरपडे, जोगदंड, झुझारे, कदम, आनकाडे, कोकाटे आदी कुळे आढळतात. मराठ्याची कुळे हीच त्यांची आडनावे आहेत.