मराठवाड्यात पावसाची उघडीप, दुबार पेरणीचे संकट

मराठवाड्यात जूनच्या दुसऱ्या आठवड्यात चांगला पाऊस पडल्याने शेतकऱ्यांनी पेरणी केली असली तरी मागील पंधरा दिवसांपासून पावसाने उघडीप घेतली आहे. त्यामुळे दुबार पेरणीचे संकट उभे राहिले आहे.
मराठवाड्यात पावसाची उघडीप, दुबार पेरणीचे संकट

सुजित ताजने/ छत्रपती संभाजीनगर

मराठवाड्यात जूनच्या दुसऱ्या आठवड्यात चांगला पाऊस पडल्याने शेतकऱ्यांनी पेरणी केली असली तरी मागील पंधरा दिवसांपासून पावसाने उघडीप घेतली आहे. त्यामुळे दुबार पेरणीचे संकट उभे राहिले आहे. तसेच, जनावरांच्या चारापाण्याचा प्रश्नही बिकट झाला आहे.

मराठवाड्यात गतवर्षी पाऊस कमी पडला. त्यामुळे महाराष्ट्रातील शेतकरी आर्थिक अडचणीत आला होता. काही भागात चांगला पाऊस पडल्याने शेतकऱ्यांनी पेरणी केली. तथापि, अवकाळी पाऊस आणि वादळ वाऱ्यामुळे हातातोंडाशी आलेली पिके नष्ट झाली. फळबागांना गारपिटीचा फटका बसला. मागील वर्ष तोट्याचे गेले. शेतकऱ्यांना राज्य सरकारने कोणतीही मदत दिली नाही. कमी पाऊस पडल्याने शेतकरी हातघाईला आला. मागील वर्षांचे नुकसान यंदा भरून निघेल असे वाटले होते. यंदा हवामान खात्यानेही चांगला पाऊस पडेल असा अंदाज वर्तविला. जून महिन्याच्या सुरुवातीला चांगला पाऊस पडला. त्यामुळे शेतकऱ्यांनी पेरणी केली. आज शेतीचा व्यवसाय हा परवडणारा नाही. खते, बियाणे, मजुरी, नागरणी, पेरणी, महाग झाली आहे. असे असताना ही शेतकऱ्यांनी पेरणी केली खरी, पण गेल्या पंधरा दिवसांपासून पावसाने पाठ फिरवली आहे. हवामान खात्याच्या चुकीच्या अंदाजामुळे शेतकरी मात्र अडचणीत आला आहे.

जनावरांच्या पाण्याचा प्रश्न बिकट

मराठवाड्यातील जनावरांच्या पाण्याची अवस्था बिकट झाली आहे. ग्रामीण भागात जवळपास हजार टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. नागरिक पाणी विकत घेत आहेत, तर कुठे शासनामार्फत पाणीपुरवठा केला जात आहे.

logo
marathi.freepressjournal.in