सर्व्हरची गती मंदावल्याने ‘लाडकी बहीण’ त्रस्त

रोजगाराची वानवा असलेल्या जव्हार तालुक्यात शासनाने घोषित केलेल्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेतून प्रति माह एक हजार पाचशे रुपये मिळणार आहे.
सर्व्हरची गती मंदावल्याने ‘लाडकी बहीण’ त्रस्त
Published on

दीपक भिसे/ जव्हार

रोजगाराची वानवा असलेल्या जव्हार तालुक्यात शासनाने घोषित केलेल्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेतून प्रति माह एक हजार पाचशे रुपये मिळणार आहे. त्यामुळे ग्रामीण तथा शहरी भागातील बहिणींना दिलासा मिळाला आहे. प्रत्येक बहीण ही आपापली कागदपत्रे जमावण्यात व्यस्त असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. मात्र,गेल्या काही दिवसांपासून 'आपले सरकार सेवा प्रणाली'च्या सर्व्हरची गती मंदावल्याने राज्यभरात महाऑनलाइन सेवा विस्कळीत झाली. परिणामी जव्हार भागातील बहिणी या सर्व्हरच्या मंदगतीमुळे त्रस्त झाल्याचे पहायला मिळत आहे.

या योजनेसाठी लागणारी आवश्यक कागदपत्र जमवताना तालुक्यात सुमारे पंधराशे प्रमाणपत्रे अडकून पडली आहेत. त्यामुळे विद्यार्थी, शेतकरी व महिलांचीही गैरसोय होत आहे. प्रमाणपत्राच्या प्रतीक्षेत ते सुविधा केंद्रावर ताटकळत आहेत. सर्व्हरची गती 'लाडकी बहीण' या योजनेच्या मुळावरही आल्याचे पाहावयास मिळत असून प्रमाणपत्र मिळवण्यासाठी होणारा विलंब लाभार्थी महिलांसाठी त्रासदायक ठरत आहे.

सध्या 'मुख्यमंत्री लाडली बहीण लाडकी योजना' व विविध योजना, प्रवेश शिष्यवृती शैक्षणिक प्रक्रियेसाठी आवश्यक उत्पन्न प्रमाणपत्र, वय व अधिवास प्रमाणपत्रासाठी महा-ई-सुविधा, आपले सरकार सेवा केंद्रांवर विद्यार्थी व महिलांची मोठ्या प्रमाणात गर्दी होत आहे. अशा वेळी नेमकी सुविधा केंद्रातील सर्व्हरची गती मंदावल्याने अडचणीत वाढ होत आहे. नवीन शैक्षणिक वर्षाची सुरवात झाली. अशा वेळी शैक्षणिक कामांसाठी विविध प्रमाणपत्रांची आवश्यकता असते. आणि त्याच प्रमाणपत्राआधारे विद्यार्थ्यांचे पुढील शिक्षणासाठी प्रवेश निश्चित होतात. पण, गेली काही दिवसांपासून सर्व्हर संथ असल्याने विविध प्रमाणपत्रे अडकून पडली आहेत.

गेल्या तीन दिवसांपासून शेतीची कामे सोडून मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे अर्ज भरण्यासाठी सकाळी लवकर येत आहोत. परंतु अर्ज भरताना घरातील कामे, लहान मुलांना सोडून महिला शासकीय कार्यालय गाठत आहेत. मात्र तिथे गेल्यावर नेटवर्क, लाइटची तसेच तांत्रिक अडचणी सांगितल्या जात आहेत. योजनेसाठी लागणारे दाखले, विद्यार्थी दाखले वेळेवर मिळत नाहीत, त्यामुळे मोठी समस्या वाढत आहे.

- उज्ज्वला महाले, जव्हार

मानसिक व आर्थिक त्रास

उत्पन्नाचे दाखले (७१३), रहिवासी दाखले बहना योजना (३१५) जातीचे दाखले (२२६), नॉन क्रिमिलेयर दाखले (३४), राष्ट्रीयत्व (९४) आदींसह एक चार पाचशे दाखले, प्रमाणपत्रे सर्व्हरची गती मंदावल्याने प्रलंबित असल्याची माहिती समोर आली आहे. महा -ऑनलाइनच्या गलथान कारभारामुळे तहसील कार्यालय, सेतू सुविधा केंद्रांच्या सर्व्हरची गती संथ झाल्याने विद्यार्थी व पालकांना याचा मानसिक व आर्थिक त्रास सहन करावा लागत आहे.

प्रकल्प व्यवस्थापकास तहसीलदारांच्या सूचना

तहसील कार्यालयास 'मुख्यमंत्री लाडकी बहीण' योजना व विविध शिष्यवृत्ती योजना, शैक्षणिक प्रवेश प्रक्रियांसाठी उत्पन्न प्रमाणपत्र, वय व अधिवास प्रमाणपत्र आदींचे अर्ज मोठ्या प्रमाणात प्राप्त होत आहेत. परंतु, काही दिवसांपासून 'आपले सरकार सेवा केंद्र प्रणाली' मध्ये खूप अडचणी येत आहेत. सदर प्रणालीची गती कमी झाली आहे. त्यामुळे नागरिकांच्या प्राप्त झालेल्या अर्जांवर कार्यवाही करण्यासाठी विलंब होत आहे. सद्यःस्थितीत नागरिकांना प्रमाणपत्र निर्गमित करण्यास अडचणीचे ठरत असल्याच्या सूचना जव्हार तहसीलदार लता धोत्रे यांनी महा - ऑनलाइनच्या प्रकल्प व्यवस्थापकाला दिल्या आहेत.

logo
marathi.freepressjournal.in