मुंबई : मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेंतर्गत पात्र महिलांच्या बँक खात्यात शुक्रवारी दिवसभरात १६ लाख महिलांच्या बँक खात्यात पैसे जमा झाल्याची माहिती महिला व बाल विकासमंत्री आदिती तटकरे यांनी दिली.
मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेंतर्गत जुलै व ऑगस्ट महिन्याचे एकूण तीन हजार रुपये जमा होतील, असे जाहीर करण्यात आले होते. १४ ऑगस्टपासून महिलांच्या बँक खात्यात पैसे जमा होत असून शनिवारी ४८ लाख पात्र महिलांच्या बँक खात्यात जुलै व ऑगस्ट महिन्याचे तीन हजार रुपये जमा होतील, असे आदिती तटकरे यांनी सांगितले.
एक कोटी महिलांच्या बँक खात्यात पैसे जमा
महायुती सरकारने आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री लाडकी बहिण योजना जाहीर केली. याबाबत महिलांची फसवणूक होईल, असा आरोप महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून केला जात आहे. महायुतीने १७ ऑगस्टला महिलांच्या बँक खात्यात पैसे जमा होतील, असे जाहीर केले. पात्र महिलांच्या बँक खात्यात १४ ऑगस्टपासूनच पैसे जमा होण्यास सुरुवात झाली असून आतापर्यंत एक कोटी महिलांच्या बँक खात्यात पैसे जमा झाल्याचे महिला व बाल कल्याण विभागाकडून सांगण्यात आले.