होळीच्या दिवशी पैसे आल्याने लाडक्या बहिणी आनंदी; पैसे काढण्यासाठी भली मोठी रांग

फेब्रुवारी महिन्यात लाडकी बहीण योजनेचे पैसे न आल्याने बहिणींच्या आनंदावर विरजण पडले होते. त्यातच सरकार हे पैसे कधी देणार, याची चिंता लाडक्या बहिणींना लागून राहिली होती.
होळीच्या दिवशी पैसे आल्याने लाडक्या बहिणी आनंदी; पैसे काढण्यासाठी भली मोठी रांग
Published on

मुंबई : फेब्रुवारी महिन्यात लाडकी बहीण योजनेचे पैसे न आल्याने बहिणींच्या आनंदावर विरजण पडले होते. त्यातच सरकार हे पैसे कधी देणार, याची चिंता लाडक्या बहिणींना लागून राहिली होती. त्यातच महिला दिनाच्या पूर्वसंध्येला फेब्रुवारी महिन्याचा हप्ता लाडक्या बहिणींच्या खात्यात जमा झाल्यानंतर मार्चचे पैसे कधी येणार, असा प्रश्न त्यांना पडला होता. आता मार्च महिन्याचे पैसे बहुतेक बहिणींच्या खात्यात होळीच्या दिवशी आल्याने लाडक्या बहिणींच्या आनंदाला पारावार उरला नाही. त्यातच पैसे काढण्यासाठी ठिकठिकाणी मोठी रांग लागल्याचे दिसून येत होते.

पैसे काढण्यासाठी पोस्ट ऑफिस किंवा बँकांबाहेर महिलांची भलीमोठी रांग लागल्याचे चित्र गुरुवारी दिसत आहे. होळी सणाच्या सणानिमित्त अकाउंटवर आलेले पैसे काढण्यासाठी पोस्ट ऑफिससमोर सकाळपासून महिलांनी गर्दी केली होती. तसेच होळी सणानिमित्ताने योजनेचे पैसे मिळाल्याने महिलांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

महाराष्ट्र सरकारने सुरू केलेल्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे फेब्रुवारी आणि मार्च महिन्यातील दुसऱ्या टप्प्यातील पैसे महिलांच्या खात्यावर जमा होण्यास सुरुवात झाली आहे. फेब्रुवारी महिन्याचे पैसे महिला दिनानिमित्त देण्यात आले होते. मात्र दोन महिन्याचे हप्ते एकत्र मिळणार, असे सांगितले जात असतानाच खात्यात केवळ १५०० रुपये जमा झाल्याने महिलांकडून नाराजी व्यक्त करण्यात आली होती. यातच आता बुधवारी आणि गुरुवारी अनेक महिलांच्या खात्यात दुसऱ्या टप्प्यातील पैसे जमा होण्यास सुरुवात झाली आहे.

काही दिवसांपूर्वीच महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी लाडकी बहीण योजनेचे ७ ते १२ मार्चपर्यंत दोन टप्प्यांमध्ये मार्च महिन्याचाही हप्ता दोन्ही महिन्याचे हप्ते दिले जाणार असल्याचे सांगितले होते. सर्व पात्र लाभार्थी भगिनींना फेब्रुवारी व मार्च महिन्याचा सन्माननिधी वितरित करण्याची प्रक्रिया ७ मार्चपासून सुरू झाली आहे, असे तटकरे म्हणाल्या.

२१०० रुपयांची प्रतीक्षाच

निवडणुकीपूर्वी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील पात्र महिलांना प्रत्येक महिन्याला २१०० रुपये देण्याचे आश्वासन महायुतीने जाहीरनाम्यात दिले होते. मुख्यमंत्र्यांनी अर्थसंकल्पाच्या वेळी २१०० रुपये देऊ असे म्हटले होते. मात्र राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी १० मार्च रोजी जाहीर केलेल्या अर्थसंकल्पात २१०० रुपयांविषयी कोणतेही भाष्य केलेले नाही. तसेच पुढील वर्षी केलेली निधीची तरतूद ही फक्त ३६ हजार कोटींची आहे. त्यामुळे सध्या तरी लाडक्या बहिणींना २१०० रुपयांसाठी प्रतीक्षाच करावी लागणार असल्याचे दिसत आहे.

logo
marathi.freepressjournal.in