

नागपूर : हिवाळी अधिवेशनादरम्यान बुधवारी लाडकी बहीण योजनेचा मुद्दा चांगलाच गाजला. राज्यात ‘गेमचेंजर’ ठरलेल्या लाडकी बहीण योजनेवरून विरोधी पक्षांनी बुधवारी सत्ताधाऱ्यांना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला. काँग्रेसचे नाना पटोले आणि महिला व बालकल्याणमंत्री अदिती तटकरे यांच्यात जुंपली असताना, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही सहभाग घेत लाडकी बहीण योजना बंद होणार नाही, वेळ आल्यावर आम्ही लाडक्या बहिणींना २१०० रुपये देऊ, असे जाहीर केले.
या योजनेतील कथित घोटाळ्यावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार खडाजंगी झाली. विरोधकांनी केवायसी प्रक्रिया आणि बोगस लाभार्थ्यांचा मुद्दा उपस्थित करत सरकारला घेरण्याचा प्रयत्न केला. काँग्रेस नेते नाना पटोले यांनी या योजनेवरून सरकारवर गंभीर आरोप केले. “लाडकी बहीण योजनेत मोठा घोळ झालेला आहे. आशा वर्कर, अंगणवाडी सेविका, ग्रामसेवक यांना कामाला लावण्यात आले. त्यांना टार्गेट देण्यात आले. अमुकअमुक फॉर्म भरून झालेच पाहिजेत, असे त्यांना सांगण्यात आले. त्यानंतर या कर्मचाऱ्यांनी अनेक ठिकाणी बोगस फॉर्म भरले आहेत. या योजनेत मोठी गडबड झालेली आहे. या गडबडीला कोण जबाबदार आहे. या योजनेसाठी वापरण्यात आलेले पैसे हे सरकारवर बसलेल्यांचे नाहीत. सत्तेत बसलेले मालक नाहीयेत. जनतेच्या पैशांचा हिशोब द्यावा लागेल,” असा जाब काँग्रेसचे आमदार नाना पटोले यांनी विचारला.
त्यावर महिला आणि बालकल्याण मंत्री अदिती तटकरे यांनीही उत्तर दिले. त्या म्हणाल्या की, “लाडक्या बहिणींना नावनोंदणी करण्यासाठी पोर्टल उपलब्ध करून देण्यात आले होते. तसेच ऑफलाईन पद्धतीनेही नावनोंदणी करण्याची सोय उपलब्ध करून दिली होती. त्यामुळे कोणताही वाद निर्माण करण्याचा प्रयत्न करू नये.”
या मुद्द्यावरून राष्ट्रवादी काँग्रेस श. प. पक्षाचे आमदार जयंत पाटील यांनीही उडी घेतली. ते म्हणाले की, “निवडणुकीत जेव्हा ही योजना झाली, तेव्हा अशा अटी यापूर्वी सांगितल्या होत्या का? ज्या लोकांनी याचा चुकीचे फायदे घेतले त्यांच्यावर कारवाई करणार का? योजना जड जाऊ लागल्याने आता केवायसी आणि कंडिशन योजनांमध्ये घेतले आहेत.” त्यावर अदिती तटकरे म्हणाल्या की, “पहिल्याच शासन निर्णयातच २ कोटी ६३ लाख लोकांची पडताळणी सुरू केली. इतर विभागतही आम्ही डेटा तपासतोय. ई-केव्हायसीचे धोरण आणले,” असे प्रत्युत्तर मंत्री आदिती तटकरे यांनी दिले. “अनेक महिलांचे बँकेत खाते नाही. त्यामुळे त्या महिलांनी या पैशांसाठी घरातील कर्त्या पुरूषाचे खाते दिले आहे. यासाठीच केवायसी आपण केली,” असे उत्तरही त्यांनी दिले.
वेळ आल्यावर २१०० रुपये देऊ -शिंदे
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नाना पटोले यांना लक्ष्य केले. “तुम्ही लाडकी बहीण योजनेवर बोलूच नये. या योजनेला तुम्ही विरोध केला होता. तुम्ही योजनेला विरोध केला म्हणूनच विधानसभा निवडणुकीत तुमचा पराभव झाला. आता आणखी तुम्ही या योजनेला विरोधच करत असाल तर भविष्यातही लाडक्या बहिणी तुम्हाला घरी बसवतील. योग्य वेळ आली की आम्ही लाडक्या बहिणींना २१०० रुपयांचा लाभही देऊ,” अशी माहिती एकनाथ शिंदे यांनी सभागृहात केली.