लाडकी बहीण योजनेचा प्राध्यापक भरतीला फटका; पाच हजार प्राध्यापकांच्या भरती मान्यतेला वित्त विभागाचा खोडा

विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राज्य सरकारने जाहीर केलेल्या लाडकी बहीण योजनेचा फटका सर्व विभागांना बसू लागला आहे. कंत्राटदारांची देणी थकली असतानाच आता निधीअभावी राज्यातील विद्यापीठे आणि महाविद्यालयांमधील प्राध्यापक भरती रखडली आहे.
लाडकी बहीण योजनेचा प्राध्यापक भरतीला फटका
लाडकी बहीण योजनेचा प्राध्यापक भरतीला फटका
Published on

मुंबई : विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राज्य सरकारने जाहीर केलेल्या लाडकी बहीण योजनेचा फटका सर्व विभागांना बसू लागला आहे. कंत्राटदारांची देणी थकली असतानाच आता निधीअभावी राज्यातील विद्यापीठे आणि महाविद्यालयांमधील प्राध्यापक भरती रखडली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्राध्यापकांच्या ५ हजार १२ पदांना मान्यता दिल्यानंतरही वित्त विभागाकडून विविध त्रुटी काढण्यात येत आहेत. यामुळे पुढील वर्षी राज्यातील विद्यापीठांचे राष्ट्रीय मानांकन आणखी घसरण्याची भीती उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केली.

उच्च शिक्षणातील विविध उपाययोजनांबाबत मंत्री चंद्रकांत पाटील यांनी बुधवारी त्यांच्या शासकीय निवास्थानी पत्रकारांशी चर्चा केली. यावेळी त्यांनी विद्यापीठातील प्राध्यापक भरती रखडल्याने राज्यातील उच्च शिक्षणाचा दर्जा घसरला असल्याबद्दल चिंता व्यक्त केली.

राज्यपालांच्या भूमिकांचाही फटका?

राज्याचे राज्यपाल तथा विद्यापीठांचे कुलपती विविध राज्यांमधून येतात. त्यामुळे ते त्यांच्या राज्यातील विद्यापीठामधील भरतीबाबत बदल सुचवितात. याचा फटका राज्यातील प्राध्यापक भरती प्रक्रियेला बसत आहे. राज्यपालांनी प्राध्यापक भरतीचे सूत्र बदलले असून त्यानुसार विद्यापीठांनी भरतीची जाहिरात काढली आहे. या भरतीसाठी अर्ज करण्याची मुदत वाढविण्यात येणार आहे. तसेच नवीन राज्यपालकांकडे प्राध्यापक भरतीचे सूत्र बदलण्यासाठी पत्रव्यवहार करण्यात येणार आहे.

logo
marathi.freepressjournal.in