मुंबई : लाडक्या बहिणीमुळे महायुतीचे सरकार राज्यात स्थापन झाले. मात्र आता लाडकी बहीण योजना महायुतीतील मंत्र्यांसाठी अडचणीची वाटू लागली आहे. लाडक्या बहिणींना महिना १५०० रुपये देण्यासाठी अन्य विभागातील निधी महिला व बालकल्याण विभागाकडे वळवण्यात येत आहे. मात्र आता लाडकी बहीण योजनेमुळे अन्य योजनांसाठी निधी कमी पडत असल्याची नाराजी महायुतीतील मंत्री दत्तात्रय भरणे यांनी व्यक्त केली.
इंदापूर येथे घरकूल धनादेश वितरणाच्या कार्यक्रमात राज्याचे मंत्री तथा स्थानिक आमदार दत्तात्रय भरणे म्हणाले की, “मी नेहमीच पाठपुरावा करत असतो. मी मुंबईत असू द्या, पुण्यात असू द्या किंवा कुठेही असू द्या, त्यातून माझ्या इंदापूर तालुक्याला सर्वाधिक निधी कसा मिळेल यासाठी मी प्रयत्न करत असतो. लाडकी बहीण योजनेमुळे निधी यायला थोडा उशीर होत आहे.
लाडकी बहीण योजनेसाठी दर महिन्याला कोट्यवधींचा निधी महिला आणि बालविकास खात्याला वर्ग करावा लागत आहे.
सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी त्यांच्या खात्याचा निधी लाडकी बहीण योजनेसाठी वळवण्यात आल्याचा आरोप केला होता. आमदार संजय गायकवाड यांनी देखील खंत व्यक्त केली होती. आमदार आमशा पाडवी यांनीही आदिवासींचा निधी लाडक्या बहिणींसाठी वळवल्याचा आरोप केला होता. आता अजित पवारांच्याच पक्षाच्या कॅबिनेट मंत्र्याने योजनांसाठी निधी वेळेवर मिळत नसल्याची तक्रार केली आहे.
‘कुठल्या योजनेला निधी मिळत नाही’
राज्याचे अर्थमंत्री तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दत्तात्रय भरणेंच्या वक्तव्यावर म्हटले की, मी त्याला विचारतो. तो माझा सहकारी आहे. मंत्रिमंडळात आहे. नेमका कुठल्या योजनेला निधी मिळाला नाही, नेमकं कुठल्या अर्थाने ते बोलले हे त्यांना विचारून मी सांगतो, अशी प्रतिक्रिया अजित पवारांनी दिली आहे.