मुंबई : मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेंतर्गत पात्र महिलांच्या बँक खात्यात मे महिन्याचे पैसे जमा होण्यास सुरुवात झाली आहे. बुधवारपासून बँक खात्यात पैसे जमा होण्यास सुरुवात झाल्याबाबत महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांनी एक्सवर पोस्ट केले.
मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेंतर्गत सुरुवातीला दोन कोटी ६५ लाख पात्र महिलांची नोंदणी झाली. यात वार्षिक उत्पन्न अडीच लाखांपेक्षा कमी असलेल्या पात्र महिलांना महिना १५०० रुपये देण्यास सुरुवात झाली. या योजनेत सुमारे १० लाख महिला अपात्र ठरल्या असून सद्यस्थितीत २ कोटी ५२ लाख पात्र महिलांच्या बँक खात्यात पैसे जमा होत आहेत. परंतु सरकारच्या तिजोरीत खडखडाट असल्याने पैशांची जमवाजमव करण्यात अडचण येत असल्याने मे महिन्याचे पैसे जून महिन्याच्या सुरुवातीला जमा करण्यात येत आहेत.
प्रती महिला १५०० रुपये आणि केंद्र सरकारच्या योजनेचा लाभ घेणाऱ्या बहिणींच्या बँक खात्यात ५०० रुपये प्रमाणे पैसे जमा करण्यास सुरुवात झाली आहे. दरम्यान, जून महिन्याचे पैसे बँक खात्यात कधी जमा होणार असा सवाल पात्र महिलांकडून उपस्थित केला जात आहे.