
मुंबई : एप्रिल महिना सरला तरीही पैसे न आल्यामुळे लाडक्या बहिणींमध्ये नाराजीची भावना होती. अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर लाडक्या बहिणींच्या खात्यात हे पैसे येतील, असे राज्य सरकारकडून स्पष्ट करण्यात आले होते. मात्र, मे महिना उजाडल्यानंतर सरकारवर टीका होऊ लागल्यावर आता येत्या २-३ दिवसांत लाडक्या बहिणींच्या खात्यात हे पैसे जमा होतील, असे महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी स्पष्ट केले आहे.
‘एक्स’वर माहिती देताना आदिती तटकरे म्हणाल्या की, “मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या महत्त्वाकांक्षी योजनेंतर्गत एप्रिल महिन्याचा सन्मान निधी पात्र लाभार्थी लाडक्या बहिणींच्या आधार लिंक असलेल्या बँक खात्यांमध्ये जमा करण्याची प्रक्रिया शुक्रवारपासून सुरू करण्यात येत आहे. पुढील २ ते ३ दिवसांत ही प्रक्रिया पूर्ण होईल आणि सर्व पात्र लाभार्थींना थेट त्यांच्या खात्यात निधी प्राप्त होईल.”
लाडक्या बहिणींमध्ये योजना बंद होण्याची धास्ती
एकीकडे राज्याच्या तिजोरीत खडखडाट असल्याची बोंब विरोधकांकडून उठवली जात असतानाच, राज्य सरकारकडूनही अनेक योजनांना कात्री लावण्यात येत आहे. त्यातच ही योजना कधीही बंद होऊ शकते, ही भावना नागरिकांमध्येही आहे. एप्रिल महिन्याचे पैसे खात्यात न आल्याने ही योजना बंद होते की काय, अशी कुजबुज लाडक्या बहिणींमध्ये असतानाच, आता २ ते ३ दिवसांत है पैसे खात्यात जमा होतील, असे सांगून आदिती यांनी बहिणींना दिलासा दिला आहे.