
मुंबई : मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेंतर्गत आठ लाख लाडक्या बहिणींना १,५०० रुपयेऐवजी महिना फक्त ५०० रुपये मिळणार आहेत. त्यामुळे महायुती सरकारने लाडक्या बहिणींची फसवणूक केली असून या सरकारला लाडक्या बहिणींचा शाप लागणार, असा घणाघात काँग्रेस नेते नाना पटोले यांनी केला आहे.
सत्तेत येताच लाडक्या बहिणींना अपात्र करण्याची मोहीम महायुती सरकारने हाती घेतली आहे. अडीच कोटी पात्र महिलांची नोंद झाली असताना पडताळणीत ५ लाख पात्र महिलांना अपात्र ठरवले. त्यानंतर आणखी ४ लाख महिलांना अपात्र ठरवले. तर आता ८ लाख महिलांना १,५०० रुपयेऐवजी महिना ५०० रुपये देणार आहे. लाडकी बहीण योजना लागू केली तेव्हा सरकारची बुद्धी भ्रष्ट झाली होती का, असा सवाल करत काँग्रेस नेते आणि माजी विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार यांनी सरकारवर निशाणा साधला.
...म्हणून ५०० रुपयेच मिळणार - जयस्वाल
आठ लाख लाडक्या बहिणी शेतकरी सन्मान योजनेचा लाभ घेत असल्याने त्यांना ५०० रुपये महिना मिळणार आहेत, असे कृषी राज्यमंत्री आशिष जयस्वाल यांनी स्पष्ट केले. लाडकी बहीण योजनेंतर्गत पूर्वी होते तेच नियम, अटी आणि निकष आता आहेत. ज्या महिला शेतकरी सन्मान योजनेचा लाभ घेतात अशांना अपात्र करण्यात आल्याचे जयस्वाल म्हणाले.