महाराष्ट्रातील लाखो विद्यार्थ्यांनी घेतली व्यसनमुक्तीची शपथ;शाळा-महाविद्यालयांतून व्यसनमुक्त संघाच्या उपक्रमाला मोठा प्रतिसाद

व्यसनमुक्त युवक संघाने राबविलेल्या उपक्रमाला राज्यभरातून मिळालेला प्रतिसाद पहाता शासनाने याच्यावर गांभिर्याने विचार करायला हवा.
महाराष्ट्रातील लाखो विद्यार्थ्यांनी घेतली व्यसनमुक्तीची शपथ;शाळा-महाविद्यालयांतून व्यसनमुक्त संघाच्या उपक्रमाला मोठा प्रतिसाद

रामभाऊ जगताप/ कराड : २०२३च्या सरत्या वर्षाला निरोप व सन २०२४ च्या नववर्षाचे स्वागत करीत असताना व्यसनाची वाढत चाललेली प्रतिष्ठा, बिभस्तपणाचे होत असलेले प्रदर्शन आणि रात्रभर मद्यपान करण्यास सरकारकडून दिली जाणारी खुली परवानगी, देशाच्या युवा व भावी सशक्त नागरिक पिढीसाठी घातक असून, याचा बालमनावर होणारा परिणाम लक्षात घेवून नववर्षाची सुरवात 'व्यसनमुक्तीची संकल्प शपथ' घेऊन करा, असे आवाहन व्यसनमुक्त युवक संघाचे वतीने करण्यात आले होते. या आवाहनाला प्रतिसाद देत राज्यभरातून शाळा-महाविद्यालयातील लाखो विद्यार्थ्यांनी व्यसनमुक्त राहण्यासाठी संकल्प शपथ घेवून व्यसनमुक्तीचा नारा दिला आहे.

व्यसनमुक्त युवक संघाचे ज्येष्ठ मार्गदर्शक ह.भ.प. गुरूवर्य बंडातात्या कराडकर यांच्या प्रेरणेने व विलासबाबा जवळ यांच्या अधिपत्याखाली गेली २५ वर्षे व्यसनमुक्ती साठी सातत्याने झगटत असलेली व्यसनमुक्त युवक संघ महाराष्ट्र या संस्थेच्या वतीने दरवर्षी ३१ डिसेंबरच्या पूर्वसंध्येपासून १ जानेवारीपर्यंत 'दारू नको दुध प्या' हा उपक्रम राज्यभर राबविला जातो. सन २०२२पासून व्यसनमुक्त युवक संघाचे मार्गदर्शक विलासबाबा जवळ यांचे संकल्पनेतून व राज्याध्यक्ष दिपक जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली शाळा- महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना संकल्प शपथ देण्याचे आवाहन करण्यात आले होते. यासाठी गेले २० दिवस प्रत्येक शाळेला भेटी देण्यासाठी राज्यभरातील कार्यकर्ते सक्रियपणे काम करीत होते.

पुणे, सोलापूर, सातारा, सांगली, कोल्हापूर, अहमदनगर, छत्रपती संभाजीनगर, जळगाव, नाशिक, बीड, वाशिम, धाराशिव, लातुर अशा अनेक जिल्ह्यांसह मुंबई-पुणे येथील शहरी भागात असणार्‍या शाळा- महाविद्यालयातून या चांगल्या ऊपक्रमाला भरभरून प्रतिसाद मिळाला आहे.अनेक शाळा महाविद्यालयांमधून व्यसनमुक्त संघाचे व्याख्याते प्रा.धनंजय देशमुख, प्रा.मारूती शेळके, तानाजी पांडूळे, बाळासाहेब शेरेकर, युवावक्ते जगन्नाथ शिंदे यांनी प्रबोधनपर मार्गदर्शन केले.

व्यसनमुक्त युवक संघाने राबविलेल्या उपक्रमाला राज्यभरातून मिळालेला प्रतिसाद पहाता शासनाने याच्यावर गांभिर्याने विचार करायला हवा. १ जानेवारी हा नववर्षाचा प्रथम दिवस व्यसनमुक्ती संकल्प दिन म्हणून जाहीर करावा असे आवाहन व्यसनमुक्त संघाचे मार्गदर्शक शहाजी काळे यांनी केली आहे.

शालेय अभ्यासक्रमाबरोबरच व्यसनांचे दुष्परिणाम सांगायला हवे

व्यसनमुक्त युवक संघाने राबविलेला उपक्रम अतिशय प्रेरणादायी असून शाळा- महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना शालेय अभ्यासक्रमाबरोबरच व्यसनांचे दुष्परिणाम व त्याची दाहकता सांगायला हवी. कॅन्सरच्या हॉस्पिटलमधील सत्य परिस्थिती दाखवावी व तेथील तज्ज्ञांनी शाळा-महाविद्यालयांत जनजागृती व्याख्याने द्यावीत, असे आवाहनही व्यसनमुक्त युवक संघाचे विलासबाबा जवळ यांनी केले आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in