ललित पाटील ड्रग प्रकरणात रोज नववीन खुलासे होताना दिसत आहेत. ललित पाटील पलायन प्रकरणात अटक करण्यात आलेला येरवडा कारागृहातील समुपदेशक सुधाकर सखाराम इंगळे याच्याबद्दल एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. येरवडा कारागृहातील समुपदेशक सुधाकर इंगळेनी ललित पाटीलला पळून जाण्यासाठी मदत केल्याचं समोर आले आहे. इंगळेची प्रतिनियुक्ती रद्द करा, अशा आशयाचे पत्र येरवडा कारागृहाने जिल्हा रुग्णालयाला लिहिले आहे.
ललित पाटील हा कारागृहात बसून ड्रग रॅकेट चालवत होता. सप्टेंबर २०२२ मध्ये येरवडा कारागृह अधीक्षक यांनी इंगळे यांच्या बदलीचे आदेश काढले होते. नियुक्ती रद्द झाली तरी सुद्धा पुनर्नियुक्ती कोण करत होतं? असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहे. डिसेंबर महिन्यामध्ये परत हाच आदेश तत्कालीन अधीक्षक यांनी जाहीर केला होता. सुधाकर इंगळे यांच्या जागी एक नवीन समुपदेशक निवडा, असं पत्र येरवडा कारागृहाने जिल्हा रुग्णालयाला दिले होते.
याप्रकरणी ससून रुग्णालयातील 16 जणांची चौकशी केली आहे. ससून रुग्णालयातील डॉक्टर, नर्स आणि इतर स्टाफची याप्रकरणी चौकशी करण्यात आली होती. ज्या डॉक्टरांनी ललित पाटील याच्यावर उपचार केले त्यांची देखील सखोल चौकशी आणि जबाब पोलिसांकडून नोंदवून घेण्यात आले आहेत. ललित पाटील हा ससून रुग्णालयातील 16 नंबर वॉर्डमध्ये दाखल झाला होता. या वार्डमध्ये कार्यरत असणाऱ्या इतर स्टाफची सुद्धा पोलिसांनी कसून चौकशी केली आहे.