लालपरी पुन्हा रस्त्यावर! आजपासून बस सेवा सुरळीत सुरु

जालन्यातील लाठीमारच्या पार्श्वभूमीवर १६ बस जाळण्यात आल्या होत्या तसंच ८ बसेसची तोडफोड केल्याने १ जूनच्या सायंकाळपासून बससेवा बंद करण्यात आली होती.
लालपरी पुन्हा रस्त्यावर! आजपासून बस सेवा सुरळीत सुरु

अंतरवाली सराटी येथील मराठा आरक्षणासाठी आंदोलन करणाऱ्या आंदोलकांवर पोलिसांनी अमानुष लाठीमार केला होता. त्यानंतर संतप्त आंदोलकांनी जिल्ह्यात अनेक ठिकाणी तब्बल १६ बस जाळल्या. त्या शिवाय आठ बसेसची तोडफोड देखील केली. त्यामुळे एक जूनच्या सायंकाळपासून बससेवा बंद करण्यात आली होती. जाळपोळ, तोडफोडीमुळे बससेवा बंद असल्याने तब्बल सहा कोटींपेक्षा अधिक नुकसान झालं आहे. बसने रोज प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या मोठी आहे. विशेष म्हणजे बसने १८ हजार विद्यार्थी रोज प्रवास करतात. त्यात १२ हजार विद्यार्थिनी आहे. शिवाय सरासरी रोज आठ हजार महिला व एक हजार ८०० ज्येष्ठ नागरिक देखील बसने प्रवास करतात. मात्र, बससेवा बंद असल्याने विद्यार्थ्यांसह या प्रवाशांचे मोठे हाल झाले होते.

राज्यात मराठा आंदोलनामुळे बस बंद असल्याने सामान्य नागरिकांना खूप कठीण परिस्थितीचा सामना करावा लागत होता. विद्यार्थ्यांना घरापासून शाळा आणि महाविद्यालयापर्यंत घेऊन जाणारी आणि सामान्य नागरिकांच्या प्रवासाचे एकमेव साधन असणारी लालपरी आता पुन्हा रस्त्यावर आली आहे. दरम्यान, काल दिवसभरात जिल्ह्यातील चार पैकी तीन आगारातून ३२ फेऱ्या झाल्या आहेत. आता परत मंगळवारपासून बससेवा सुरळीत सुरू होणार आहे. त्यामुळे बसला कोणीही लक्ष्य करू नये, असं आवाहन महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या वतीने करण्यात आलं आहे. दरम्यान, रविवारपासून आंदोलनाची परिस्थिती थोडीफार नियंत्रणात आल्याने सोमवारी जिल्ह्यातील चार पैकी तीन आगारातून बस सुरू करण्यात आल्या आहेत. यात जालना आगारातून २२, परतूर आगारातून आठ व जाफराबाद आगारातून दोन बस फेऱ्या झाल्या आहेत.

शिवाय बुलडाणा जिल्ह्यातील बसही सुरळीत सुरु करण्यात आल्या आहेत. तसंच जालना, मंठा, परतूर, हिंगोलीपर्यंत बस सोडण्यात आल्या. तर जालना ते राजूरपर्यंत बस सुरू केल्या आहेत. शिवाय सायंकाळी छत्रपती संभाजीनगर येथून ही जालना आगारात बस येण्यास सुरवात झाली होती. आजपासून जिल्ह्यातील चारही आगारातून बससेवा सुरू केली जाणार आहे. त्यामुळे विद्यार्थी आणि प्रवाशांची सोय होणार आहे. बस ही सार्वजनिक प्रवासाची एकमेव व्यवस्था आहे. बस बंद राहिल्यामुळे अनेक विद्यार्थी आणि प्रवाशांची गैरसोय झाली होती. त्यामुळे बसचे कोणते ही नुकसान होणार नाही, याची काळजी सर्व नागरिकांनी घ्यावी असं सरकारच्या वतीने सांगण्यात आलं आहे.

logo
marathi.freepressjournal.in