
नवी दिल्ली : भाषा ही आपली ओळख, अस्मिता आणि अभिमान असून, भाषा हेच आपले अस्तित्व आहे. भाषा संपली तर आपले अस्तित्वही संपेल हे लक्षात घेऊन तिच्या संवर्धनासाठी सर्वांनी कटिबद्ध असायला हवे, असे आवाहन राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ९८ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या समारोपप्रसंगी रविवारी केले. तर मराठीला अभिजात वैभव प्राप्त करून देण्यासाठी शासन सर्वतोपरी प्रयत्न करेल, अशी ग्वाही देताना नवी दिल्लीत मराठीजनांसाठी स्वतंत्र भव्य वास्तू उभारण्यात येईल, अशी घोषणा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली.
मराठीला वैश्विक पातळीवर नेण्यासाठी कालबद्ध कार्यक्रम आखून यासाठी साहित्यिक, विचारवंत आणि शासनाकडून संयुक्तपणे प्रयत्न व्हायला हवेत, अशी अपेक्षा व्यक्त करून उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले, राज्याच्या कारभारात मराठीचा वाढता वापर होत आहे. सर्वसामान्यांच्या व्यवहार व शिक्षणात मराठीचा वापर वाढण्याची गरज आहे. नवी दिल्ली येथील जवाहरलाल नेहरू विद्यापीठात कुसुमाग्रज यांच्या नावे मराठी अध्यासन केंद्र सुरु करण्यासाठी राज्य शासनाने दहा कोटी रुपये दिले असून लवकरच हे केंद्र कार्यान्वित होणार आहे. रिद्धपूर मराठी भाषा विद्यापीठासाठी पुरेसे मनुष्यबळ व निधी उपलब्ध करून दिला जाईल, असेही शिंदे म्हणाले.
मराठी भाषिकांच्या पाठीशी सरकार ठामपणे उभे - अजित पवार
मराठीला अभिजात वैभव प्राप्त करून देण्यासाठी शासन सर्वतोपरी प्रयत्न करेल अशी ग्वाही देताना नवी दिल्लीत मराठीजनांसाठी स्वतंत्र भव्य वास्तू उभारण्यात येईल, अशी घोषणा करून उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, महाराष्ट्राच्या भव्य संस्कृतीला साजेशा अशा या वास्तूसाठी आगामी अर्थसंकल्पात शासन पुरेसा निधी उपलब्ध करून देईल. मराठी ज्ञानभाषा व्हावी, मराठीची उपयुक्तता वाढावी, ती बहुजात आणि बहुज्ञात व्हावी, यासाठी विशेष प्रयत्न होणे आवश्यक आहे. मराठी भाषेला अभिजात वैभव प्राप्त करून देण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जातील. मराठी भाषेच्या संवर्धनासाठी, प्रसारासाठी शासन निधी कमी पडू देणार नाही, तसेच महाराष्ट्र कर्नाटक सीमेवरच्या मराठी भाषिकांच्या पाठीशी सरकार ठामपणे उभे राहील, असेही पवार यांनी सांगितले.
घराघरातील मुले मराठीत शिकली पाहिजेत - डॉ. तारा भवाळकर
मराठी शाळांच्या सुधारणांसाठी आर्थिक तरतूद करण्यात यावी अशी अपेक्षा व्यक्त करून संमेलनाध्यक्षा डॉ. तारा भवाळकर म्हणाल्या, भाषा ही संस्कृतीची वाहक असते. तिची निगा राखणे आपल्या सर्वांचे कर्तव्य आहे. चांगले ठराव झाले. ते प्रत्यक्ष आले पाहिजेत. सीमा भागात त्या-त्या भाषिकांची संख्या लक्षात घेऊन द्वैभाषिक शाळा सुरू झाल्या पाहिजेत. इंग्रजी माध्यमांच्या शाळेत दुय्यम स्तरावरची मराठी शिकवली जाते. त्यात सुधारणा व्हावी. परदेशी भाषांप्रमाणेच भारतातील इतर भाषा शिकण्याची सोय हवी. शासनाने त्यासाठी कृतीशील पावले उचलावीत. मराठी भाषा वाढण्यासाठी घराघरातील मुले मराठीत शिकली पाहिजेत याची सर्वांनी काळजी घ्यावी. ‘भूतां परस्परे जडो, मैत्र जीवांचे' ही संत ज्ञानेश्वरांची उक्ती आत्मसात करत आपण स्नेह, प्रेम वाढवूया, अशा शब्दात त्यांनी आपल्या भावपूर्ण भाषणाचा समारोप केला.