

लासलगाव : लासलगांव येथून मोठ्या प्रमाणात कांदा देशातील विविध राज्यांमध्ये रेल्वे रॅकद्वारे पाठवला जातो. सध्या कांदा वाहतुकीसाठी पुरेशा प्रमाणात रेल्वे रॅक वेळेत उपलब्ध करून देण्यासाठी रेल्वे प्रशासनाकडे पाठपुरावा करण्याबाबत लासलगाव बाजार समितीने पुढाकार घ्यावा, अशी मागणी बाजार समितीचे व्यापारी सदस्य प्रवीण कदम व बाळासाहेब दराडे यांनी निवेदनाद्वारे केली आहे. दरम्यान, लासलगाव बाजार समितीत २ ते ४ सलग तीन दिवस व्यापारी कांदा लिलावात सहभागी होणार नसल्याने कांद्याचे लिलाव ठप्प होणार आहे.
लासलगांवसह जिल्ह्यातील बाजार समित्यांमध्ये खरीप (लाल) कांद्याची मोठ्या प्रमाणात आवक सुरू असून या आवकेचा निकास (कांद्याची तात्काळ विल्हेवाट) करण्यासाठी व्यापारी वर्गाला रेल्वे वाहतुकीवर मोठ्या प्रमाणात अवलंबून राहावे लागत आहे. मात्र अलीकडील काळात रेल्वे रॅक पुरेशा प्रमाणात उपलब्ध होत नसल्यामुळे तसेच अपुरे चालक व मनुष्यबळामुळे काही वेळा रेल्वे रॅक एकाच ठिकाणी २ ते ३ दिवस उभे राहत असल्याच्या घटना घडत आहेत. परिणामी कांद्याचा निकास होत नसल्याने माल साचून राहत आहे.