लासलगाव : हिली लँड पोर्ट मार्गे भारतातून बांगलादेशमध्ये कांदा निर्यात थांबली

हिली लँड पोर्ट या सीमावर्ती मार्गाद्वारे आयात होणाऱ्या कांद्याबद्दल हा निर्णय लागू करण्यात आला आहे. बांगलादेशच्या या निर्णयाचा मोठा फटका नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांना बसण्याची शक्यता आहे.
लासलगाव : हिली लँड पोर्ट मार्गे भारतातून बांगलादेशमध्ये कांदा निर्यात थांबली
Published on

लासलगाव : बांगलादेश सरकारने भारतातून कांदा आयात करण्यासाठी नवीन आयात परवाने थांबवले आहेत. हिली लँड पोर्ट या सीमावर्ती मार्गाद्वारे आयात होणाऱ्या कांद्याबद्दल हा निर्णय लागू करण्यात आला आहे. बांगलादेशच्या या निर्णयाचा मोठा फटका नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांना बसण्याची शक्यता आहे.

सरकारने नव्या परवान्यांवर मंजुरी देणे बंद केले असून, आधी मंजूर झालेल्या परवान्याखालील आयात या महिन्या अखेर दि. ३० जानेवारी पर्यंत सुरू राहणार आहे. नाशिक जिल्ह्यातून दररोज १५०० टन कांदा बांगला देशात निर्यात होत आहे.

बांगलादेशात कांद्याची मागणी वाढत आहे. त्यामुळे डिसेंबर २०२५ च्या पहिल्या आठवड्यात बांगलादेश सरकारने कांदा आयातीसाठी दररोज ५० परवाने दिले होते दुसऱ्या आठवड्यात दिनांक १५ डिसेंबरला परवान्यांची संख्या चौपट करून २०० वाढविण्यात आली होती. यामुळे नाशिक जिल्ह्यातून बांगलादेशकडे जाणाऱ्या कांद्याच्या निर्यातीला वेग मिळाला होता. भारतातून बांग्लादेशमध्ये होणारी निर्यात मंदावल्याने लासलगाव बाजार समितीसह नाशिक जिल्ह्यात कांद्याच्या दरात मोठी घसरण सुरू झाली आहे.

लासलगावसह राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये लाल कांद्याची मोठ्या प्रमाणावर आवक होत असल्याने परिणामी दर कोसळत आहे. तसेच बांगलादेशातील अस्थिर परिस्थितीमुळे भारतातून होणारी कांदा निर्यात मर्यादित प्रमाणातच सुरू आहे.

याचा भारतीय कांद्याच्या निर्यातीवर प्रतिकूल परिणाम होत आहे.बांग्लादेश सरकारने कांदा उत्पादकांच्या हितासाठी आणि स्थानिक बाजारात शेतकऱ्यांचे आर्थिक संरक्षण करण्यासाठी कांदा आयातीवर निर्बध लादले आहे. पुरवठा आधीपासूनच सुरू असला तरी आता नवीन परवाने मिळणार नसल्याचे त्यांनी जाहीर केले आहे.

शेतकऱ्यांना १७५ ते २०० कोटींचा फटका

एकट्या नाशिक जिल्ह्यात गेल्या पंधरा दिवसांत विविध बाजार समित्यांमध्ये झालेल्या सुमारे २० लाख क्विंटल कांद्याच्या आवकेमुळे अंदाजे १७५ ते २०० कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.

लाल कांद्याची मोठी आवक असताना बांगलादेशने नवीन आयात परवान्यावर निर्बंध घातल्याने याचा फटका निर्यातीला बसू शकतो.

विकास सिंह, कांदा निर्यातदार, नाशिक

logo
marathi.freepressjournal.in