

हारुन शेख/लासलगाव
केंद्र सरकारच्या ग्राहक संरक्षण विभागाच्या निर्देशानुसार दिल्लीतील कांद्याचे वाढते बाजारभाव नियंत्रणात आणण्यासाठी लासलगाव येथून दिल्लीला पाठवण्यात येणारी ‘कांदा एक्सप्रेस’ बुधवारी प्रहार जनशक्ती पक्षाच्या कार्यकत्यार्ंनी रोखून धरली. त्यामुळे काही काळ तणाव निर्माण झाला होता. मात्र, रेल्वे सुरक्षा दल आणि पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेतले. तब्बल ४२ तासांच्या विलंबानंतर बुधवारी दुपारी ३.१० वाजता दिल्लीच्या दिशेने रवाना झाली. ८४० मेट्रिक टन कांदा पाठवण्याचे नियोजन असताना प्रतवारी व ४० किलोच्या गोण्यांचे पॅकिंग वेळेत पूर्ण न झाल्याने प्रत्यक्षात केवळ ५०० मेट्रिक टन कांदा रेल्वेने रवाना झाला. ३४० मेट्रिक टन कांदा कमी पाठवला गेल्याने एनसीसीएफ व सेंट्रल वखार महामंडळाच्या नियोजनावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
दिल्ली येथे शासकीय कांदा पाठवण्यासाठी लासलगाव रेल्वे स्थानकात सोमवारी रात्री २१ बोगींची मालगाडी दाखल झाली होती. सेंट्रल वखार महामंडळाच्या नियोजनानुसार ही कांदा एक्सप्रेस मंगळवारी सकाळी सात वाजता दिल्लीसाठी रवाना होणे अपेक्षित होते. मात्र, गोदामात साठवलेल्या कांद्याची प्रतवारी आणि ४० किलोच्या गोण्यांमध्ये पॅकिंग करण्याचे काम वेळेत पूर्ण न झाल्याने लोडिंगला विलंब झाला.
विलंबाचा अंदाजे १.८ लाखांचा दंड
कांदा एक्सप्रेस लासलगाव रेल्वे स्थानकात तब्बल ३२ तास अतिरिक्त कालावधी थांबल्याने रेल्वेकडून डिटेन्शन शुल्क आकारले जाण्याची शक्यता आहे. प्रतिबोगी सुमारे १५० रुपये प्रतितास या दराने शुल्क आकारले गेल्यास २१ बोगींसाठी अंदाजे १ लाख ८ हजार रुपयांचा अतिरिक्त खर्च होऊ शकतो.
आंदोलनामुळे तणाव
कांद्याच्या गुणवत्तेवरून कांदा एक्सप्रेसला प्रहार जनशक्ती पक्षाचे उत्तर महाराष्ट्र प्रमुख गणेश निंबाळकर यांनी सहकाऱ्यांसह कांदा लोडिंग व रेल्वे रवाना करण्यास तीव्र विरोध केला. केंद्रीय ग्राहक संरक्षण विभागाच्या अटी व नियमांनुसार खरेदी केलेला दर्जेदार कांदा या गाडीत पाठवला जात नसल्याचा आरोप त्यांनी केला. निकृष्ट व सडलेला कांदा दिल्लीला पाठवून त्याला ‘कांदा एक्सप्रेस’चे नाव कसे देता, असा सवाल त्यांनी करत कांदा एक्स्प्रेस रोखून धरली.