
हारून शेख/लासलगाव
अमृत भारत स्टेशन योजनेअंतर्गत नाशिक जिल्ह्यातील लासलगाव रेल्वे स्थानकाचा सुमारे साडेदहा कोटी रुपयांच्या निधीतून भव्य आधुनिक स्वरूपात पुनर्विकास करण्यात आला. कांद्याच्या बाजारपेठेसाठी ओळखल्या जाणाऱ्या या भागासाठी हा बदल महत्त्वपूर्ण मानला जातो. तरी देखील, कोविड काळात अनेक महत्त्वाच्या गाड्यांचे थांबे रद्द करण्यात आले आहेत, ते अद्याप सुरू करण्यात आलेले नाही. स्थानक चकाचक पण गाड्या कधी थांबणार? असा सवाल लासलगाव परिसरातील शेकडो प्रवासी करीत आहे.
कोविडपूर्वी लासलगाव स्थानकावर गोदावरी एक्स्प्रेस, देवगिरी एक्स्प्रेस, शालिमार एक्स्प्रेस, जनता एक्स्प्रेस, पुणे-भुसावळ एक्स्प्रेस आणि हावडा एक्स्प्रेस या गाड्यांचे थांबे होते. मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हे थांबे बंद करण्यात आले व आजतागायत पुन्हा सुरू करण्यात आलेले नाहीत. त्यामुळे लासलगावमधील शेतकरी, व्यापारी, विद्यार्थी परप्रांतीय कामगार व्यापारी वर्गाला मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ खासदार भास्कर भगरे यांनी रेल्वे प्रशासनाकडे ठोस मागणी केली आहे. दुसरीकडे, उगाव स्टेशनवरही पॅसेंजर गाड्यांचे थांबे बंद झाल्याने स्थानिकांनी न्यायालयाचा दरवाजा ठोठावला आहे, आणि न्यायालयाने रेल्वे प्रशासनाला दोन महिन्यांत निर्णय घेण्याचे निर्देश दिले आहेत.
कांदा व्यापारांसह विद्यार्थ्यांच्या प्रवासात अडथळे
लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समिती देशातील सर्वात मोठ्या कांदा बाजारपेठांपैकी एक असून, येथून देशांतर्गत तसेच परदेशातही कांद्याची निर्यात होते. रेल्वे स्थानकावरून मालवाहतूक मोठ्या प्रमाणात सुरू असली तरी प्रवासी वाहतूक ठप्प झाल्याने स्थानकाचा पुरेपूर उपयोग होताना दिसत नाही.
गाडी थांबत नसल्याने स्टेशन हायटेक करून काय उपयोग?
अनेक गाड्यांचे थांबे रद्द झाल्याने स्थानिक प्रवाशांमध्ये नाराजीचे वातावरण आहे. “कोट्यवधींचा निधी खर्चून उभारलेले स्टेशन सुंदर दिसतंय, पण प्रवाशांशिवाय ओस पडल्याचे चित्र नेहमीचे आहे. गाड्याच थांबत नसतील, तर विकासाचा फायदा कोणाला?” रेल्वे प्रशासनाने लासलगाव रेल्वे स्थानकावर गाड्यांचे थांबे तातडीने वाढवले नाही तर उगांव प्रमाणेच न्यायालयीन पावले उचलण्यात येईल, अशी भूमिका प्रवासी संघटनेने घेतली आहे.