

हारून शेख
लासलगाव : कांद्याचे आगार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीसह नाशिक जिल्ह्यातील विविध बाजार समित्यांमध्ये लाल कांद्याची आवक वाढू लागली आहे. वाढत्या आवकेमुळे कांद्याच्या बाजारभावावर दबाव निर्माण झाला असून, गुरुवारी लाल कांद्याच्या कमाल दरात प्रतिक्विंटल ३०० रुपयांची, तर उन्हाळ कांद्याच्या दरात १४४ रुपयांची घसरण झाली. त्यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या चिंतेत भर पडली आहे.
बुधवारी लाल कांद्याचा कमाल दर प्रतिक्विंटल ५ हजार ७०० रुपये होता. गुरुवारी तो घसरून ५ हजार ४०० रुपयांवर आला. तर जुन्या उन्हाळ कांद्याचा कमाल दर ४ हजार ५३५ रुपयांवरून ४ हजार ३९१ रुपयांपर्यंत खाली आला.
लासलगाव बाजार समितीत गुरुवारी लाल कांद्याची २३१ वाहनांमधून ३ हजार ३६४ क्विंटल आवक झाली. या कांद्याला प्रतिक्विंटल कमाल ५ हजार ४०० रुपये, किमान १ हजार ८५२ रुपये, तर सरासरी ४ हजार ७०० रुपये भाव मिळाला.
दुसरीकडे, उन्हाळ कांद्याची १४७ वाहनांमधून २ हजार १०२ क्विंटल आवक झाली. या कांद्याला प्रतिक्विंटल कमाल ४ हजार ३९१ रुपये, किमान १ हजार ५०० रुपये, तर सरासरी ४ हजार रुपये दर मिळाला.
लाल कांद्याची आवक दिवसेंदिवस वाढत असल्याने बाजारभावात चढ-उतार सुरू आहेत. उत्पादन खर्चाच्या तुलनेत अपेक्षित भाव मिळेल की नाही, याबाबत शेतकऱ्यांमध्ये चिंता व्यक्त होत आहे. आगामी काळात कांद्याची आवक आणि बाजारभावाची दिशा काय राहणार, याकडे जिल्ह्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.