लासलगाव बाजारात सोयाबीन दरात ५०० रुपयांची घसरण; अमेरिका-भारत करारामुळे शेतकरी चिंतेत

आंतरराष्ट्रीय बाजारातील घडामोडी आणि अमेरिका-भारत यांच्यात झालेल्या कराराचा परिणाम देशांतर्गत बाजारावर दिसू लागला असून, त्याचा थेट फटका सोयाबीन उत्पादकांना बसत आहे. कांद्यापाठोपाठ आता लासलगाव बाजार समितीत सोयाबीनच्या दरात अचानक सुमारे रु. ५०० प्रति क्विंटल घसरण झाली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.
लासलगाव बाजारात सोयाबीन दरात ५०० रुपयांची घसरण; अमेरिका-भारत करारामुळे शेतकरी चिंतेत
लासलगाव बाजारात सोयाबीन दरात ५०० रुपयांची घसरण; अमेरिका-भारत करारामुळे शेतकरी चिंतेत
Published on

हारून शेख / लासलगाव

आंतरराष्ट्रीय बाजारातील घडामोडी आणि अमेरिका-भारत यांच्यात झालेल्या कराराचा परिणाम देशांतर्गत बाजारावर दिसू लागला असून, त्याचा थेट फटका सोयाबीन उत्पादकांना बसत आहे. कांद्यापाठोपाठ आता लासलगाव बाजार समितीत सोयाबीनच्या दरात अचानक सुमारे रु. ५०० प्रति क्विंटल घसरण झाली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.

गेल्या आठवड्यात लासलगाव बाजार समितीत सोयाबीनला प्रति क्विंटल ५,८०० पर्यंत दर मिळाले होते. हमीभावापेक्षा अधिक दर मिळाल्याने शेतकरी समाधानी होते. मात्र काही दिवसांतच दर घसरून ५,३०० पर्यंत खाली आले आहेत. या अचानक घसरणीमुळे उत्पादकांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे. दरवाढीच्या अपेक्षेने अनेक शेतकऱ्यांनी माल साठवून ठेवला होता. मात्र दर कमी झाल्याने त्यांना मोठा आर्थिक फटका बसण्याची शक्यता आहे. उत्पादन खर्च, मजुरी, खत-बियाणे, वाहतूक आणि पावसामुळे वाढलेला खर्च लक्षात घेता सध्याचा बाजारभाव परवडणारा नसल्याची भावना शेतकऱ्यांकडून व्यक्त होत आहे. दरम्यान, आगामी काळात दर स्थिर राहतील की आणखी घसरण होईल, याबाबत शेतकरी वर्गात संभ्रम आहे. शासनाने तातडीने हस्तक्षेप करून बाजार स्थिर ठेवावा, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

करारामुळे आयात वाढण्याची भीती

सोयाबीन दरातील घसरणीसाठी अमेरिका-भारत करार कारणीभूत असल्याचा आरोप शेतकरी करत आहेत. या करारामुळे आयात वाढेल आणि देशांतर्गत बाजारात दरावर दबाव येईल, अशी भीती व्यक्त होत आहे. त्यामुळे सोयाबीनचा शासकीय हमीभाव तातडीने ₹६,००० प्रति क्विंटल करण्यात यावा आणि संबंधित कराराचा पुनर्विचार करावा, अशी मागणी शेतकरी संघटनांकडून होत आहे.

लागवडीपासून काढणीपर्यंत सततच्या पावसामुळे उत्पादन खर्च वाढला आहे. सध्याच्या दरात कुठलाही फायदा होत नाही. हमीभाव सहा हजार रुपये करावा.

ज्ञानेश्वर घुले, सोयाबीन उत्पादक

कांद्यापाठोपाठ सोयाबीनच्या दरात घसरण सुरू आहे. केंद्र आणि राज्य सरकारने वेळीच हस्तक्षेप करावा, अन्यथा शेतकरी कर्जबाजारी होऊन टोकाची भूमिका घेईल.

कृष्णा शिंदे, सोयाबीन उत्पादक

अमेरिका-भारत कराराचा परिणाम शेती पिकांवर होत आहे. सोयाबीनमध्ये ₹५०० ते ₹६०० घसरण झाली आहे. अशीच परिस्थिती मक्याच्या दरातही आहे. व्यापाऱ्यांनाही मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.

नंदकुमार डागा, सोयाबीन निर्यातदार

logo
marathi.freepressjournal.in