अकरावी प्रवेशाची अखेरची संधी; आजपासून करता येणार नोंदणी

राज्यात अकरावीच्या ऑनलाईन प्रवेशाच्या १० फेऱ्यांनंतरही अनेक विद्यार्थ्यांना प्रवेश मिळालेला नाही. अतिवृष्टी व पूरस्थिती लक्षात घेऊन शिक्षण विभागाने शेवटची संधी देण्याचा निर्णय घेतला आहे. ४ ते ६ ऑक्टोबरदरम्यान नोंदणी करता येणार असून ७ ऑक्टोबरला प्रवेशाचे वेळापत्रक जाहीर होईल.
अकरावी प्रवेशाची अखेरची संधी; आजपासून करता येणार नोंदणी
Published on

मुंबई : राज्यात अकरावी ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेच्या आत्तापर्यंत १० फेऱ्या राबविण्यात आलेल्या आहेत. यानंतरही अनेक विद्यार्थ्यांचे प्रवेश झालेले नाहीत. राज्यातील काही जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टी व पूरस्थितीचा विचार करून विद्यार्थ्यांसाठी अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेची शेवटची संधी देण्याचा निर्णय शिक्षण विभागाने घेतला आहे. त्यानुसार ४ ते ६ ऑक्टोबर या कालावधीत विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी नोंदणी करता येणार असून ७ ऑक्टोबर रोजी प्रवेश घेण्याचे वेळापत्रक जाहीर करण्यात येणार आहे.

शैक्षणिक सत्र २०२५-२६ पासून संपूर्ण राज्यामध्ये इयत्ता अकरावीचे प्रवेश केंद्रीय ऑनलाइन पद्धतीने करण्यात येत आहेत. राज्यातील काही जिल्ह्यात अतिवृष्टी व पूर आल्याने विधानसभा अध्यक्ष आणि शालेय शिक्षण मंत्री यांच्या उपस्थितीमध्ये ३० सप्टेंबर रोजी बैठक संपन्न झाली. या बैठकीत अध्यक्षांनी अकरावी प्रवेश न घेतलेल्या विद्यार्थ्यांना शेवटची संधी देण्याचे निर्देश अधिकाऱ्यांना दिले होते.

६ ऑक्टोबरपर्यंत मुदत

४ ऑक्टोबर रोजी सकाळी १० वाजेपासून ते ६ ऑक्टोबर रोजी दुपारी ३ वाजेपर्यंत विद्यार्थ्यांना नविन नोंदणी, प्राधान्यक्रम भरणे, प्राधान्यक्रमात बदल करता येणार आहे. तसेच या फेरीमध्ये अर्ज भरताना विकल्प भरण्याची व नोंदणीची अंतिम सुविधा देण्यात येणार आहे, असे शिक्षण संचालनालयाचे संचालक डॉ. महेश पालकर यांनी कळवले आहे.

logo
marathi.freepressjournal.in