

लातूर : अल्पवयीन मुलीचे अपहरण केल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आलेल्या तरुणाचा पोलिस कोठडीत सोमवारी मृत्यू झाला. त्याला रविवारी अटक करण्यात आली होती. त्यामुळे त्याच्या मृत्यूविषयी संशय व्यक्त करीत त्याच्या नातेवाइकांनी पोलीस ठाण्याबाहेर आंदोलन केले. तथापि, या प्रकरणाची चौकशी गुन्हे अन्वेषण विभागाकडे (सीआयडी) सोपविण्यात आल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.
अमित रमेश चव्हाण (वय २१) असे मृत तरुणाचे नाव आहे. तो अहमदपूर तालुक्यातील मार्शिवणी गावचा रहिवासी होता. सोमवारी पहाटे किनगाव पोलीस ठाण्यातील एका खोलीत त्याने गळफास घेतल्याचे आढळून आले, अशी माहिती एका अधिकाऱ्याने दिली.
हा तरुण आणि एक अल्पवयीन मुलगी अहिल्यानगर रेल्वे स्थानकावर आढळले होते. त्यानंतर दोघांना किनगाव पोलीस ठाण्यात आणण्यात आले. तेथे त्याला मुलीचे अपहरण केल्याच्या आरोपावरून अटक करण्यात आली.
दरम्यान, तरुणाच्या नातेवाइकांनी पोलीस ठाण्याबाहेर ठिय्या आंदोलन केले. त्याच्या मृत्यूस जबाबदार व्यक्तींवर कारवाई होईपर्यंत मृतदेह ताब्यात घेण्यास त्यांनी नकार दिला. लातूरचे पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांनी घटनास्थळी धाव घेत नातेवाइकांशी चर्चा केली.