

लातूर : लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत काँग्रेसचे माजी आमदार धीरज देशमुख यांच्या नेतृत्वाखालील सहकार पॅनेलने १९ पैकी १४ जागा जिंकत दणदणीत विजय मिळवला. भाजप नेते संभाजी पाटील-निलंगेकर आणि आमदार रमेश कराड यांच्या नेतृत्वाखालील परिवर्तन पॅनेलला पाच जागांवर समाधान मानावे लागले.
निलंगा मतदारसंघात संभाजी पाटील-निलंगेकर यांचे बंधू अरविंद पाटील-निलंगेकर यांनी आपल्या आत्या संगीता अशोक पाटील-निलंगेकर यांचा पराभव केला, तर भाजप आमदार रमेश कराड यांचे पुत्र ऋषिकेश कराड यांनी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अशोक गोविंदपूरकर यांच्यावर मात केली. धीरज देशमुख यांनीही सहकार पॅनेलकडून विजय मिळवला. राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार दिवंगत चंद्रशेखर भोसले यांच्या कन्या प्रीती चंद्रशेखर भोसले यांनी उदगीर सोसायटी मतदारसंघातून अवघ्या १० मतांच्या फरकाने विजय मिळवला. राज्याचे सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांचे जावई हेमंत जाधव यांनी लातूर मतदारसंघातून सहकार पॅनेलच्या तिकिटावर विजय मिळवला.
मत्स्यव्यवसाय आणि गृहनिर्माण मतदारसंघात सहकार पॅनेलचे जयेश विश्वंभर माने यांनी निर्णायक विजय मिळवला. त्यांना एकूण ४५ पैकी ३५ मते मिळाली. या विजयावर प्रतिक्रिया देताना काँग्रेस नेते धीरज देशमुख म्हणाले, हा विजय जनतेची सकारात्मक राजकारणाला असलेली पसंती दर्शवतो. लोकशाहीत विरोधी पक्ष महत्त्वाचे असतात. त्यांनी आपली भूमिका बजावत राहिली पाहिजे. सहकारमंत्री बाबासाहेब पाटील यांनी दिलेल्या पाठिंब्याबद्दलही देशमुख यांनी त्यांचे आभार मानले. विरोधाला न जुमानता सहकाराला प्राधान्य देण्याच्या भूमिकेतून पाटील यांनी पॅनेलला साथ दिल्याचे त्यांनी सांगितले. बाबासाहेब पाटील हे सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सदस्य आहेत.