लातूरला नांगराच्या औताला पत्नीला जुंपले; आर्थिक परिस्थिती नसल्याने शेतकऱ्याची हतबलता

खरीप हंगाम सुरू झालेला असतानाच शेतकऱ्यांची पेरणीची लगबग सुरू झाली आहे. मात्र, राज्यातील शेतकऱ्यांची परिस्थिती किती भयानक आहे, याचे उदाहरण लातूरमधून समोर आले आहे.
लातूरला नांगराच्या औताला पत्नीला जुंपले; आर्थिक परिस्थिती नसल्याने शेतकऱ्याची हतबलता
लातूरला नांगराच्या औताला पत्नीला जुंपले; आर्थिक परिस्थिती नसल्याने शेतकऱ्याची हतबलता
Published on

लातूर : खरीप हंगाम सुरू झालेला असतानाच शेतकऱ्यांची पेरणीची लगबग सुरू झाली आहे. मात्र, राज्यातील शेतकऱ्यांची परिस्थिती किती भयानक आहे, याचे उदाहरण लातूरमधून समोर आले आहे. वीज कोसळून बैल दगावला आणि दुसरा बैल खरेदी करण्याची आर्थिक ताकद नसल्याने नांगराच्या औताला पत्नीला जुंपण्याची वेळ लातूरमधील शेतकऱ्यावर आली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे (शप) आमदार रोहित पवार यांनी मराठवाड्यातील शेतकऱ्याची परिस्थिती दाखवणारा व्हिडीओ सोशल मीडियावरून शेअर केला आहे. या कुटुंबाला त्वरित मदत मिळवून देण्याची आणि शेतकऱ्यांना विनाअट सरसकट कर्जमाफी देण्याची मागणी आमदार पवारांनी या पोस्टमधून केली आहे.

रोहित पवारांनी शेअर केलेल्या व्हिडीओ पोस्टनुसार, सदर व्हिडीओ लातूर जिल्हा, देवणी तालुक्यातील बांबळी गावातील आहे. ‘काशिनाथ गायकवाड’ असे या शेतकऱ्याचे नाव आहे. त्यांचा एक बैल वीज कोसळून दगावला आणि दुसरा बैल खरेदी करण्याची त्यांची आर्थिक स्थिती नाही. त्यामुळे त्यांच्यावर नांगराच्या औताला पत्नीला जुंपण्याची वेळ ओढवली’, असे रोहित पवारांनी पोस्टमध्ये म्हटले आहे. शेतकऱ्यांची परिस्थिती विदारक असल्याचे आमदार पवारांनी पोस्टमध्ये म्हटले आहे.

सरसकट कर्जमाफी करा

देशातील नागरिकांचे पोट भरण्यासाठी राबणाऱ्या अन्नदात्या कुटुंबाला जनावराची जागा घ्यावी लागते हे अत्यंत वेदनादायी आहे, असे म्हणत पवारांनी शेतकऱ्याला मदत मिळवून देण्याची विनंती केली.

स्थानिक अधिकारी, लोकप्रतिनिधी, मंत्र्यांनी या घटनेची दखल घेऊन कुटुंबाला त्वरित मदत मिळवून द्यावी. बळीराजाला या संकटातून बाहेर काढण्यासाठी विनाअट सरसकट कर्जमाफी करण्याची मागणीही त्यांनी केली.

व्हिडीओमधील महिला त्यांचे नाव हौसाबाई काशिनाथ गायकवाड असल्याचे सांगत आहेत. गेल्या आठवड्यात शुक्रवारी बैलावर वीज कोसळून त्याचा मृत्यू झाल्याने औत ओढण्याची वेळ आल्याचे त्या सांगत आहेत.

मदत मिळाली नाही

हौसाबाई त्यांचा मुख्य व्यवसाय शेतीच असल्याचे सांगत आहेत. वीज कोसळून बैल दगावल्यानंतर अधिकाऱ्यांनी पाहणी केली मात्र मदत मिळाली नसल्याचे हौसाबाई सांगत आहेत. तसेच, औत ओढताना शारीरिक वेदना, त्रास होत असल्याची कैफियत त्यांनी मांडली.

logo
marathi.freepressjournal.in