
लातूर : लातूर महानगरपालिकेचे आयुक्त बाबासाहेब मनोहरे यांनी शनिवारी रात्री स्वत:वर गोळी झाडून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. लातूर येथील त्यांच्या शासकीय निवासस्थानात शनिवारी रात्री गोळी झाडल्याचा आवाज आला. त्यानंतर जखमी अवस्थेत मनोहरे यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांच्यावर सध्या उपचार सुरू असून, त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. मनोहरे यांनी आत्महत्येचा प्रयत्न का केला, याचे नेमके कारण अद्याप समोर आलेले नाही. त्यांच्यावर सह्याद्री रुग्णालयात उपचार सुरू आहेत. घटनेची माहिती मिळाल्यानंतर महापालिका कर्मचारी आणि इतर नागरिकांनी रुग्णालयाबाहेर गर्दी केली होती.
मनोहरे यांनी कुटुंबीयांसोबत जेवण केल्यानंतर ते खोलीत निघून गेले. त्यानंतर काही क्षणातच त्यांनी आपल्या रिव्हॉल्व्हरने स्वतःवर गोळी झाडून घेतली. गोळीचा आवाज आल्याने कुटुंबीय खोलीकडे धावले. रक्ताच्या थारोळ्यात असलेल्या मनोहरे यांना जखमी अवस्थेतच रुग्णालयात नेण्यात आले. त्यांच्या मेंदूला इजा झाली असून शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. डोक्याच्या उजव्या बाजूने गोळी आरपार गेली असून सध्या त्यांची प्रकृती स्थिर आहे. उपचाराला ते प्रतिसाद देत आहेत, असे सह्याद्री हॉस्पिटलचे डॉ. हनुमंत किणीकर यांनी सांगितले. बाबासाहेब मनोहरे यांनी यापूर्वी मराठवाड्यातील धाराशिव, नांदेड या जिल्ह्यांमध्ये काम केले आहे. लातूर महानगरपालिकेत ते सुरुवातीला अतिरिक्त आयुक्त होते. नंतर बढती मिळून ते महानगरपालिका आयुक्त झाले होते.