मुंबई : राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षामार्फत (सीईटी कक्ष) विधी पाच वर्षे अभ्यासक्रमाची पहिली यादी जाहीर केली आहे. या यादीत प्रवेश मिळालेल्या विद्यार्थ्यांना ७ ते ९ ऑगस्ट रोजी महाविद्यालयात जाऊन प्रवेश घेण्याची मुदत देण्यात आली आहे. मात्र राज्य सरकारने ८ ऑगस्ट रोजी नारळी पौर्णिमेनिमित्त सुट्टी जाहीर केली आहे. मात्र शुक्रवारी प्रवेश प्रक्रिया सुरूच ठेवण्याचा निर्णय सीईटी कक्षाने घेतला आहे.
विधी पाच वर्षे अभ्यासक्रमाची प्रथम यादी ६ ऑगस्ट रोजी जाहीर झाली. या यादीत प्रवेश मिळालेल्या विद्यार्थ्यांना महाविद्यालयात जाऊन प्रवेश घेण्याची मुदत ७ ते ९ ऑगस्टपर्यंत देण्यात आली आहे. त्यानुसार गुरुवारी सायंकाळी ५ वाजेपर्यंत ६८६ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतले. मात्र शुक्रवारी राज्य सरकारने सुट्टी जाहीर केल्याने विद्यार्थ्यांची कोंडी होणार होती. प्रवेशासाठी कमी वेळ मिळणार असल्याने विद्यार्थ्यांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले होते. विद्यार्थ्यांना दिलासा देण्यासाठी नारळी पौर्णिमेच्या दिवशी प्रवेश प्रक्रिया सुरू राहणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष महाविद्यालयमध्ये जाऊन प्रवेश घ्यावा, असे आवाहन सीईटी कक्षामार्फत करण्यात आले आहे.
मुंबई विद्यापीठाच्या परीक्षा पुढे ढकलल्या
नारळी पौर्णिमेनिमित्त सार्वजनिक शासकीय सुट्टी जाहीर केल्यामुळे मुंबई विद्यापीठाच्या नियोजित परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. परीक्षांच्या सुधारित तारखा लवकरच जाहीर केल्या जाणार आहेत. मुंबई विद्यापीठाशी संलग्नित सर्व महाविद्यालये, शैक्षणिक संस्था आणि दूरस्थ आणि ऑनलाईन शिक्षण केंद्राच्या (‘सीडीओई’ पूर्वीचे ‘आयडॉल’) ८ ऑगस्ट २०२५ रोजी विविध अभ्यासक्रमांच्या परीक्षा आयोजित करण्यात आल्या होत्या. परंतु नारळी पौर्णिमेनिमित्त सार्वजनिक शासकीय सुट्टी जाहीर केल्यामुळे या सर्व परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत, असे संचालक परीक्षा व मूल्यमापन मंडळ डॉ. पूजा रौंदळे यांनी सांगितले.