परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे निलंबित; पाच दिवस विधानभवन परिसरात प्रवेश बंदी, उपसभापतींकडून ठराव मंजूर

राहुल गांधी यांच्या वक्तव्याचे पडसाद सोमवारी विधान परिषदेत उमटले आणि विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी सत्ताधारी पक्षाचे आमदार प्रसाद लाड यांना अपशब्द वापरले.
परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे निलंबित; पाच दिवस विधानभवन परिसरात प्रवेश बंदी, उपसभापतींकडून ठराव मंजूर

मुंबई : राहुल गांधी यांच्या वक्तव्याचे पडसाद सोमवारी विधान परिषदेत उमटले आणि विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी सत्ताधारी पक्षाचे आमदार प्रसाद लाड यांना अपशब्द वापरले. यावरून सत्ताधारी पक्षाच्या आमदारांनी दानवे यांच्यावर कारवाईची मागणी लावून धरली होती. संसदीय कार्यमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दानवे यांच्या निलंबनाचा ठराव मांडला आणि चर्चा न करताच तो मंजूर करण्यात आला. यात दानवे यांचे पाच दिवसांसाठी निलंबन केले असून विधानभवन परिसरात प्रवेश बंदी घालण्यात आल्याचे उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी जाहीर केले. हा एकतर्फी निर्णय असून बाजू मांडण्याची संधी न दिल्याने विरोधकांनी सत्ताधारी पक्षाविरोधात घोषणाबाजी केली. सत्ताधारी व विरोधी पक्षाच्या गोंधळात सभागृहाचे कामकाज तीन वेळा तहकूब झाले.

संसदेचे पावसाळी अधिवेशन सुरू असून काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी सोमवारी हिंदुत्वाचा मुद्दा उपस्थित करत भाजपवर जोरदार टीका केली. राहुल गांधी यांच्या या वक्तव्याचे पडसाद सोमवारी विधान परिषदेत उमटले. राहुल गांधी यांच्या वक्तव्यावरून सत्ताधारी पक्षाच्या आमदारांनी विधान परिषदेत घोषणाबाजी केली. यावेळी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी त्यास सडेतोड उत्तर देत भाजपविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. यावेळी दानवे यांनी भाजप आमदार प्रसाद लाड यांना अपशब्द वापरत हातवारे केले, असा आरोप लाड यांनी परिषदेत केला. यानंतर लाडही आक्रमक झाले आणि दानवे व लाड यांच्यात शाब्दिक चकमक उडाली. त्यानंतर दानवे यांच्यावर कारवाई करण्याची मागणी भाजप आमदारांनी लावून धरली होती. मंगळवारी दुपारनंतर विधान परिषदेचे कामकाज दुपारी २ वाजता सुरू होताच संसदीय कार्यमंत्री चंद्रकांत पाटील यांनी अंबादास दानवे यांना पाच दिवसांसाठी निलंबित करण्याचा ठराव मांडला. ठराव मांडल्यानंतर आमची बाजू मांडण्याची संधी द्या, अशी मागणी विरोधकांनी केली. मात्र, उपसभापतींनी ठराव मंजूर केल्याचे जाहीर केले. त्यानंतर विरोधकांनी वेलमध्ये जाऊन सभापतींच्या पक्षपातीपणाचा निषेध केला. ‘सभापती हाय हाय’, ‘न्याय द्या न्याय द्या- सभापती न्याय द्या’, ‘बहुमताच्या जोरावर निर्णय घेणाऱ्या सरकारचा धिक्कार असो’, अशा घोषणा देत विरोधकांनी सभात्याग करत दिवसभरासाठी कामकाजावर बहिष्कार घातला.

दानवेंचे निलंबन हे षडयंत्र - उद्धव ठाकरे

अंबादास दानवे चुकीचे काही म्हणाले असतील तर मी माफी मागतो, पण अंबादास दानवेंवर कारवाई ठरवून, षडयंत्र रचून केली गेली आहे, असा आरोप उद्धव ठाकरे यांनी केला. चंद्रकात पाटील यांचे सुप्रिया सुळेंवर केलेले विधान आणि सुधीर मुनगंटीवार यांच्या विधानावर कोणतीही कारवाई करण्यात आली नाही याची आठवण यावेळी ठाकरेंनी करून दिली. विरोधी पक्षनेता निलंबित होतोय, असे पहिल्यांदाच घडले. कालचा आमचा दणदणीत विजय झाकोळून टाकण्यासाठी दानवेंचे निलंबन करण्यात आले, अशी टीका ठाकरे यांनी केली.

ठरावावर चर्चा करता येत नाही - फडणवीस

दानवे यांच्या निलंबनाचा ठराव दुपारी परिषदेत मांडला, त्यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते. अशा ठरावावर चर्चा होत नाही किंवा करता येत नाही. यापूर्वीही अनेक जणांवर अनेक कारणांमुळे अशी कारवाई झालेली आहे. त्यावेळी ठरावावर चर्चा करण्यात आलेली नाही. त्यामुळे निलंबनाच्या या ठरावावर चर्चा होणार नाही, असे फडणवीस यांनी स्पष्ट केले.

logo
marathi.freepressjournal.in