शिवसेनेकडून पराभवाचे खापर अपक्ष व छोटया पक्षांवर

अपक्षांची मते आम्हाला मिळाली नाहीत. कारण ते कोणाचेच नसतात. प्रत्यक्ष मतदान करत असताना कोणत्याही प्रकारचे धार्मिक प्रदर्शन करायचे नसते. मात्र,
sanjay raut
sanjay rautANI

राज्‍यसभेची निवडणूक महाविकास आघाडीला सोपी ठरणार अशी हवा असतानाच भाजपने धनंजय महाडिक यांच्या रूपाने तिसरी जागा जिंकत आघाडीला धोबीपछाड दिला. अटीतटीच्या लढाईत शिवसेनेच्या संजय पवार यांचा पराभव झाला आहे. या विजयाचे शिल्‍पकार ठरले ते विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस. अपेक्षित संख्याबळ असतानाही झालेला हा पराभव आघाडीच्या विशेषतः शिवसेनेच्या जिव्हारी लागला आहे. याचे पडसाद लगेचच होणा-या विधानपरिषदेच्या निवडणुकीत तर उमटणार आहेतच पण राज्‍याच्या राजकारणावरही त्‍याचे दूरगामी परिणाम होणार आहेत. मुख्यमंत्री उदधव ठाकरे यांनी झालेला हा पराभव अतिशय गंभीरपणे घेतला आहे. मुख्यमंत्री ठाकरे हे लवकरच झाडाझडती घेणार असल्‍याचेही समजते. तर दुसरीकडे भाजपाच्या गोटात जल्‍लोषाचे वातावरण असून देवेंद्र फडणवीस यांनी राज्‍यसभेचा मास्‍टरस्‍ट्रोक देत गोवा,बिहारनंतर त्‍यांनी महाराष्‍ट्रात विजयाची हॅटट्रीक साधली आहे.

राज्‍यसभेची निवडणूक अत्‍यंत चुरशीची तर झालीच पण विविध कारणांमुळे गाजली देखील. अगदी शेवटच्या क्षणापर्यंत निकालाची उत्‍कंठा ताणली गेली. मतदानप्रक्रियेत आरोप-प्रत्‍यारोप झाल्‍याने केंद्रिय निवडणूक आयोगाच्या कोर्टात देखील ही निवडणूक गेली. निकाल लागायला अखेर पहाट उजाडावी लागली. भाजपाच्या धनंजय महाडिक यांनी विजयश्री खेचून आणत शिवसेनेच्या संजय पवार यांचा पराभव केला.

शिवसेनेकडून पराभवाचे खापर अपक्ष व छोटया पक्षांवर

अत्यंत चुरशीच्या ठरलेल्या राज्यसभा निवडणुकीत शिवसेना उमेदवार संजय पवार यांचा पराभव झाला. शिवसेनेने या पराभवाचे खापर अपक्ष आमदार आणि छोट्या पक्षांवर फोडले आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शंकरराव गडाख,राज्यमंत्री बच्चू कडू, राजेंद्र यड्रावकर आदी ज्यांच्याशी आमची चर्चा झाली होती आणि जे पक्षाबरोबर आणि आघाडीसोबत आहेत अशी सगळीच्या सगळी मते आम्हाला मिळाली असल्‍याचा दावा शिवसेना नेते तथा विजयी उमेदवार संजय राउत यांनी केला. बहुजन विकास आघाडी आणि दोन अपक्ष आमदार यांनी शेवटच्या क्षणी टांग दिल्याने राज्यसभा निवडणुकीत शिवसेनेचा पराभव झाल्याचा दावा करताना घोडेबाजारात जे लोक उभे होते, त्यांची सहा ते सात मते आम्हाला मिळू शकली नाहीत, अशा शब्दात राऊत यांनी भाजपला मतदान करणाऱ्या आमदारांचा समाचार घेतला.

बहुजन विकास आघाडीचे हितेंद्र ठाकूर, क्षितिज ठाकूर, राजेश पाटील, शेतकरी कामगार पक्षाचे श्यामसुंदर शिंदे, सोलापूर जिल्ह्यातील अपक्ष संजय मामा शिंदे, मोर्शीचे देवेंद्र भुयार या सहा आमदारांनी ऐनवेळी मत बदलल्याने शिवसेनेच्या उमेदवाराचा पराभव झाल्याचा दावा राऊत यांनी केला. जे बाजारातील नेहमीचे घोडे असतात, ते घोडे विकले गेले. ते घोडे बाजारात होते. जास्त बोली लागली, असे मला वाटते. अपक्षांची मते आम्हाला मिळाली नाहीत. कारण ते कोणाचेच नसतात. प्रत्यक्ष मतदान करत असताना कोणत्याही प्रकारचे धार्मिक प्रदर्शन करायचे नसते. मात्र, अमरावतीचे शहाणे जे काही उद्योग करत होते, त्यांचे मत घटनेनुसार बाद व्हायला हवे होते, असे राऊत म्हणाले.

पहाटे ज्या काही गोष्टी करण्यात आल्या. त्यांना पापकृत्य करण्याची पहाटेची फार सवय आहे. त्या उपक्रमाला आमच्या शुभेच्छा आहेत. तुम्ही असेच उपक्रम करत राहा आणि महाराष्ट्राचा एकदाचा कायमचा घोडेबाजार करून टाका, असा संताप संजय राऊत यांनी व्यक्त केला.

देशातील केंद्रीय यंत्रणा सत्ताधारी पक्षाच्या दबावाखाली कशा प्रकारे काम करतात हे काल आम्ही डोळ्यांनी पाहत होतो. कुठे ईडी, कुठे सीबीआय वापरले जाते. आता अशा प्रकारच्या निवडणूक यंत्रणाही वापरल्या जातात का? अशी शंका येते. राज्यसभा निवडणुकीत आमचा एक उमेदवार विजयी होऊ शकला नाही. याचा अर्थ असा नाही कोणीतरी समोर फार मोठा देदीप्यमान विजय मिळवला, अशी टीका राऊत यांनी केली.

Related Stories

No stories found.
marathi.freepressjournal.in