सिंधुदुर्ग-रत्नागिरीवरून भाजप-शिंदे गटात जुंपली; किरण सामंत नाराज

सिंधुदुर्ग-रत्नागिरीवरून भाजप-शिंदे गटात जुंपली; किरण सामंत नाराज

भाजप आणि शिवसेना शिंदे गटात मंगळवारी रात्री चर्चा झाल्यानंतर शिवसेनेचे उदय सामंत यांनी या जागेवरचा दावा सोडला होता. विशेष म्हणजे त्यासंबंधी सोशल मीडियावर पोस्टही टाकण्यात आली होती. त्यामुळे ही जागा जवळपास भाजपला सुटली असल्याची चर्चा रंगली होती.

मुंबई : सिंधुदुर्ग-रत्नागिरीत शिवसेना उद्धव ठाकरे गटाने विद्यमान खासदार विनायक राऊत यांना पुन्हा मैदानात उतरविले आहे. परंतु, शिंदे गट आणि भाजपात याच जागेवरून टोकाचा वाद सुरू झाला आहे. या ठिकाणी भाजपचे नेते नारायण राणे यांनी दावा सांगितला आहे. ही जागा भाजपची असून, येथे कुणीही दावा सांगू शकत नाही, असे राणे यांनी म्हटले आहे. मात्र, दुसरीकडे शिंदे गटाचे नेते मंत्री उदय सामंत यांनी ही जागा प्रतिष्ठेची बनवली असून, त्यांचे बंधू किरण सामंत यांच्यासाठी ही जागा सोडावी, असा आग्रह धरला आहे.

त्यामुळे हा वाद चिघळण्याची शक्यता आहे. खरे तर यावर भाजप आणि शिवसेना शिंदे गटात मंगळवारी रात्री चर्चा झाल्यानंतर शिवसेनेचे उदय सामंत यांनी या जागेवरचा दावा सोडला होता. विशेष म्हणजे त्यासंबंधी सोशल मीडियावर पोस्टही टाकण्यात आली होती. त्यामुळे ही जागा जवळपास भाजपला सुटली असल्याची चर्चा रंगली होती. मात्र, आज सकाळी किरण सामंत यांनी पुन्हा आपली भूमिका बदलली. त्यांनी रात्री टाकलेली पोस्ट आज डिलीट केली आणि आपण रत्नागिरी-सिंधुदुर्गचा दावा सोडलेला नाही, असे स्पष्ट केले. त्यामुळे पुन्हा या जागेवरून वाद सुरू झाल्याचे चित्र आहे. दरम्यान, मंत्री उदय सामंत आणि भाजप नेते नारायण राणे यांच्यात रात्री उशिरा चर्चा झाली. रात्री दीड ते दोनच्या सुमारास त्यांच्यात चर्चा झाली. त्यानंतर उदय सामंत मुंबईला निघून गेले होते. उदय सामंत यांनी सिंधुदुर्गात झालेल्या महायुतीच्या बैठकीतही हजेरी लावली नाही. दरम्यान, नारायण राणे आणि उदय सामंत यांच्यात नेमकी काय चर्चा झाली, काय घडले, ते समजू शकले नाही. परंतु, उदय सामंत यांनी किरण सामंत यांनी जे रात्री ट्विट केले, ते भावनेच्या भरात केले होते. आम्ही अजूनही रत्नागिरी-सिंधुदुर्गचा दावा सोडलेला नाही, असे स्पष्ट केले.

सामंत बंधूंचे घूमजाव

रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघावरून भाजपचे नारायण राणे आणि शिवसेना शिंदे गटाचे उदय सामंत आणि किरण सामंत यांच्यात चर्चा झाली. त्यानंतर खुद्द किरण सामंत यांनी मंगळवारी रात्री आम्ही या जागेचा दावा सोडलेला आहे, असे ट्विट करून जाहीर केले. परंतु, आज सकाळी पुन्हा हे ट्विट डिलिट करून आम्ही जागेवरचा दावा सोडलेला नाही, असे जाहीर केले. त्यामुळे सामंत बंधूंच्या मनात नेमके काय चालले आहे, अशी चर्चा आहे. दुसरीकडे नारायण राणे ही जागा सोडायला तयार नाहीत. त्यामुळे या जागेवरून भाजप आणि शिवसेना शिंदे गटात हा वाद टोकाला जाण्याची शक्यता आहे.

logo
marathi.freepressjournal.in