विधान परिषद निवडणुकीची उत्सुकता शिगेला; जागा ११, उमेदवार १२, कोण पडणार? कोण जिंकणार? मविआचे तीन उमेदवार निवडणूक रिंगणात

विधान परिषद निवडणुकीची उत्सुकता शिगेला; जागा ११, उमेदवार १२, कोण पडणार? कोण जिंकणार? मविआचे तीन उमेदवार निवडणूक रिंगणात

लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला मतदारराजाने दिलेल्या कौलामुळे महाविकास आघाडीचा आत्मविश्वास चांगलाच वाढला आहे.

मुंबई : लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला मतदारराजाने दिलेल्या कौलामुळे महाविकास आघाडीचा आत्मविश्वास चांगलाच वाढला आहे. मविआने दोन उमेदवार विजयी होण्याची शाश्वती असताना तिसरा उमेदवार रिंगणात उतरवल्याने विधान परिषदेच्या निवडणुकीची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. दरम्यान, ११ जागांसाठी १२ जुलैला मतदान प्रक्रिया पार पडणार असून एकूण १२ उमेदवार रिंगणात उतरले आहेत.

लोकसभा निवडणुकीत मिळालेले यश आणि पदवीधर व शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीतही मविआचा बोलबाला झाल्याने मविआच्या नेत्यांचा आत्मविश्वास वाढला आहे, तर महायुतीला अपेक्षेप्रमाणे यश न मिळाल्याने त्यांनी सावध भूमिका घेतली आहे. आगामी विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून विधान परिषदेच्या निवडणुकीत रणनीती आखली जात आहे. आगामी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राज्यातील विधान परिषदेच्या ११ जागांसाठी निवडणूक होत असल्याने लोकांमध्ये चुकीचा मेसेज जाऊ नये म्हणून सगळेच पक्ष जपून पावले टाकत आहेत. ही निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी प्रयत्न होण्याची शक्यता असताना ११ जागांसाठी १२ उमेदवार आखाड्यात उतरल्याने चुरस वाढली आहे. त्यामुळे कोणाचा पत्ता कट होणार आणि कोणाला विधान परिषदेची संधी मिळणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

विधान परिषदेच्या ११ जागांसाठी होणाऱ्या निवडणुकीत ५ जागांवर भाजपने उमेदवार उभे केले आहेत. अजित पवार राष्ट्रवादी गटाने दोन उमेदवार दिले आहेत आणि शिवसेना एकनाथ शिंदे गटाने दोन उमेदवार मैदानात उतरवले आहेत. शिवसेना ठाकरे गटाने एक, शरद पवार गट आणि काँग्रेसनेही एकेक उमेदवार दिला आहे. मात्र, शरद पवार गटाने शेकापचे नेते जयंत पाटील यांना पाठिंबा दिला आहे.

विधानसभेच्या २८८ पैकी १४ जागा राजीनामे किंवा सदस्याच्या निधनामुळे रिक्त आहेत. त्यामुळे निवडणुकीत २७४ सदस्य मतदान करणार असून पहिल्या पसंतीच्या मतांचा कोटा कमी झाल्याने विजयासाठी पहिल्या पसंतीच्या २३ मतांची आवश्यकता असेल. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर ही निवडणूक होत आहे. त्यामुळे आमदारांना एक संधी उपलब्ध झाली आहे. भाजपचे १०३ आमदार असून, अपक्ष व छोट्या पक्षांच्या मदतीने भाजपचे पाच उमेदवार सहज निवडून येऊ शकतात. शिंदे गटाकडे स्वत:चे ४०, तर १० अपक्ष आहेत. त्यामुळे त्यांचे दोन उमेदवार निवडून येतील. अजित पवार गटाकडे ४३ आमदारांचे पाठबळ असल्याने दोन उमेदवार निवडून येण्याएवढे संख्याबळ आहे. ३६ आमदार असलेल्या काँग्रेसचा एक उमेदवार सहज निवडून येईल व त्यांच्याकडे अतिरिक्त मते शिल्लक राहतील. ठाकरे आणि शरद पवार गट एकत्र आल्यास त्यांचा एक उमेदवार निवडून येऊ शकतो.

मिलिंद नार्वेकरांना ठाकरे गटाकडून उमेदवारी

काँग्रेसकडील अतिरिक्त मतांच्या आधारे महाविकास आघाडीचा तिसरा उमेदवार निवडून आणण्याची खेळी खेळली जात आहे. त्यामुळे शिवसेना ठाकरे गटाच्या मिलिंद नार्वेकर यांना उभे करण्यात आले आहे. दरम्यान, मंगळवारी मिलिंद नार्वेकर यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपचे नेते प्रवीण दरेकर यांची भेट घेतल्याने परिषदेच्या निवडणुकीत कोण बाजी मारणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

असा आहे मतांचा कोटा!

या निवडणुकीत विजयासाठी २३ मतांचा कोटा ठरवण्यात आला आहे. मात्र, बारावा उमेदवार रिंगणात उतरल्याने ही निवडणूक चुरशीची होणार आहे. सध्या काँग्रेसकडे ४४, ठाकरे गटाकडे १६ आणि शरद पवार गटाकडे १३ मते आहेत. या मतांची एकूण बेरीज ७३ होते. मतांचा कोटा २३ चा आहे. त्यामुळे ७३ संख्याबळानुसार महाविकास आघाडीच्या तिन्ही पक्षाच्या उमेदवारांना २४ मते मिळू शकतात. त्यामुळे त्यांचा विजय निश्चित होऊ शकतो. पण क्रॉस व्होटिंग झाल्यास त्याचा फटकाही बसू शकतो.

भाजपचे उमेदवार

१) पंकजा मुंडे, २) परिणय फुके,

३) सदाभाऊ खोत, ४) अमित गोरखे, ५) योगेश टिळेकर.

राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट)

१) शिवाजीराव गर्जे, २) राजेश विटेकर

शिवसेना (शिंदे गट)

१) कृपाल तुमाने, २) भावना गवळी

शिवसेना- ठाकरेंची शिवसेना

१) मिलिंद नार्वेकर

शरद पवार गटपुरस्कृत उमेदवार

१) जयंत पाटील (शेकाप)

काँग्रेस

१) प्रज्ञा सातव

logo
marathi.freepressjournal.in