विधानपरिषद निवडणुकीत बहुरंगी लढत

विधान परिषदेच्या मुंबई पदवीधर, मुंबई शिक्षक, कोकण पदवीधर आणि नाशिक विभागीय शिक्षक या चार जागांच्या निवडणुकीसाठी येत्या २६ जूनला मतदान होत आहे. या निवडणुकीत उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत बुधवारी संपली.
विधानपरिषद निवडणुकीत बहुरंगी लढत
Published on

मुंबई : विधान परिषदेच्या मुंबई पदवीधर, मुंबई शिक्षक, कोकण पदवीधर आणि नाशिक विभागीय शिक्षक या चार जागांच्या निवडणुकीसाठी येत्या २६ जूनला मतदान होत आहे. या निवडणुकीत उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत बुधवारी संपली. आता विधान परिषद निवडणुकीचे चित्र स्पष्ट झाले असून मुंबई पदवीधरमध्ये शिवसेना ठाकरे गट विरुद्ध भाजप अशी मुख्य लढत होईल. तर मुंबई शिक्षकमध्ये ठाकरे गट, अजित पवार गट, भाजप आणि समाजवादी गणराज्य पक्ष अशी चौरंगी लढत होईल. कोकण पदवीधरमध्ये भाजप विरुद्ध काँग्रेस, तर नाशिक शिक्षक मतदारसंघात शिवसेना शिंदे गट, अजित पवार गट आणि ठाकरे गट अशी तिरंगी लढत होणार आहे.

शिवसेना शिंदे गटाने विधान परिषद निवडणुकीतून माघार घेतली आहे. मात्र, महायुतीचा घटक पक्ष असलेल्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसने मुंबई शिक्षक मतदारसंघातील आपला उमेदवार कायम ठेवला आहे. त्यामुळे मुंबई शिक्षक मतदारांसघात महायुतीत सामना रंगणार आहे.

विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी भाजपने परस्पर उमेदवार घोषित केल्याने शिंदे गटानेही आपले उमेदवार रिंगणात उतरविले होते. शिंदे गट महायुतीत मुंबई पदवीधरच्या जागेसाठी विशेष आग्रही होता. त्यासाठी शिंदे गटाने याआधी मुंबई पदवीधर मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केलेल्या माजी मंत्री दीपक सावंत यांना उमेदवारी दिली होती. मात्र, भाजपने आपला आग्रह कायम ठेवल्याने शिंदे गटाला सावंत यांचा अर्ज मागे घ्यावा लागला आहे.

कोकण पदवीधरमध्ये भाजपचे निरंजन डावखरे यांच्यासाठी शिंदे गटाच्या संजय मोरे यांना माघार घ्यावी लागली. कोकण पदवीधरमधून शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या किशोर जैन यांनी तर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या अमित सरैया यांनी माघार घेतल्याने तिथे निरंजन डावखरे विरूद्ध काँग्रेसचे रमेश कीर यांच्यात प्रमुख लढत होणार आहे. कोकण पदवीधरमधून १२ उमेदवारांनी माघार घेतल्याने येथे आता १३ उमेदवार रिंगणात आहेत.

मुंबई विभागीय शिक्षक मतदारसंघात अजित पवार गटाने शिवाजीराव नलावडे यांची उमेदवारी कायम ठेवली आहे. त्यामुळे येथे भाजपचे शिवनाथ दराडे, शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे ज. मो. अभ्यंकर आणि समाजवादी गणराज्य पक्षाचे सुभाष मोरे यांच्यात लढत होईल. मुंबई शिक्षकमधून काँग्रेसच्या प्रकाश सोनवणे यांनी माघार घेतली. नाशिक विभागीय शिक्षक मतदारसंघातून एकूण १५ उमेदवारांनी आपले अर्ज मागे घेतले. त्यामुळे नाशिकमध्ये महाविकास आघाडीतील उद्धव ठाकरे गटाचे संदीप गोपाळराव गुळवे, एकनाथ शिंदे गटाचे किशोर दराडे आणि अजित पवार गटाचे महेंद्र भावसार या प्रमुख उमेदवारांमध्ये लढत होईल.

logo
marathi.freepressjournal.in