
उन्हाळा वाढू लागताच लिंबाचे भाव झपाट्याने वाढत आहेत. मागील आठवड्याच्या तुलनेत मंगळवारी लिंबाचे दर तिप्पट झाल्याचे निदर्शनास आले आहे. मागील सात दिवसांपासून प्रतिक्विंटल लिंबाला २००० ते २५०० रुपयांपर्यंत भाव मिळत होता. मात्र, उष्णतेत झालेली वाढ आणि ग्राहकांच्या वाढत्या मागणीमुळे मंगळवारी लिंबाला प्रतिक्विंटल ८००० एवढा उच्चांकी भाव मिळाला आहे. तर किरकोळ बाजारात लिंबू प्रतिकिलो ७० ते ९० रुपयांपर्यंत विक्री होत असल्याचे भाजीपाला व्यापाऱ्यांकडून सांगण्यात येत आहे. दरम्यान, उन्हाळ्यात लिंबाच्या मागणीत वाढ झाली असून वर्षभरात झालेल्या अवकाळी पावसामुळे उत्पादनात मात्र मोठी घट झाल्याचे निदर्शनास येत आहे.
वर्षभर झालेला अवकाळी पाऊस हा लिंबासाठी नुकसानीचा ठरत आहे. वातावरणातील बदलाचा परिणाम आतापर्यंत खरीप आणि रब्बी हंगामावर तर झालेलाच होता, पण सध्याच्या ढगाळ वातावरणामुळे लिंबू उत्पादनावरही याचा विपरित परिणाम होऊ लागला आहे. ढगाळ वातावरणामुळे फळधारणाच झाली नाही. परिणामी, उत्पादन हे निम्म्यावर आले आहे. त्यामुळे लिंबाला विक्रमी दर मिळत आहे. तर दुसऱ्या बाजूला उत्पादन कमी झाल्याने आवकवर त्याचा परिणाम होताना दिसत आहे. दरम्यान, ऐन हंगामात उत्पादन पदरी पडणार असताना निसर्गाचा लहरीपणा शेतकऱ्यांसाठी नुकसानकारक ठरत आहे. आतापर्यंत द्राक्ष, आंबा आणि आता लिंबू उत्पादकांचे नुकसान होऊ लागले आहे. परिणामी, शेतकऱ्यांनी उत्पादन वाढीसाठी केलेले बहुतांश प्रयोग फोल ठरत आहेत.
लिंबाची आयात सुरू
ऐन उन्हाळ्यात लिंबू विकायला यावेत म्हणून शेतकऱ्यांकडून योग्य ते नियोजन केले जाते. त्यानुसारच लागवडही ठरते. यंदा मात्र शेतकऱ्यांनी नियोजन केले पण निसर्गाच्या लहरीपणामुळे सर्व काही वाया गेले आहे. परिणामी, स्थानिक शेतकऱ्यांकडे लिंबू नसल्याने व्यापाऱ्यांना लिंबाची आयात करण्याची नामुष्की ओढवली आहे. माल असला तर योग्य ती किंमत मिळत नाही आणि विक्रमी दर असला तर माल नाही हे आता नित्याचेच झाले आहे. सध्या लिंबाची आयात करुन तब्बल ८० ते १०० रुपये किलोप्रमाणे लिंबाची विक्री केली जात आहे. अशीच परिस्थिती राहिली तर लिंबापासून बनविण्यात येणाऱ्या थंडपेयाच्या किंमती देखील वाढतील असा अंदाज आहे.