

लासलगाव : नाशिक जिल्ह्यात तीन ठिकाणी बिबट्याच्या हल्यात दोन जण ठार झाले असून एक जण गंभीर जखमी झाल्याची घटना घडली आहे. मृतांमध्ये तीन वर्षीय चिमुकल्या आयुषचा समावेश आहे. नाशिक रोडजवळील वडनेरदुमाला गावातील भगत यांचे घर शेतात आहे. शुक्रवारी रात्रीच्या सुमारास त्यांच्या घरात बिबट्या शिरला. जेवायला म्हणून आयुषला हाक मारली असता प्रतिसाद न मिळाल्याने त्याची शोधाशोध सुरु झाली.
तीन तासानंतर रक्तबंबाळ अवस्थेतील आयुषचा मृतदेह ऊसाच्या शेतात सापडला. ते पाहून कुटुंबियांसह सर्वांनाच धक्का बसला.
दिंडोरी शहरातील बदादे वस्तीवर बिबट्याच्या हल्ल्यात
जनाबाई बदादे (६५) हिचा मृत्यू झाला आहे. शेतात काम करत असताना बिबट्याने तिच्यावर हल्ला केला. आजुबाजूच्या कामगारांनी तिला बिबट्याच्या जबड्यातून सोडवले. मात्र तिच्या मानेला बिबट्याने लचका घेतल्याने ती जागीच ठार झाली.
कळवण तालुक्यातील मळ्यात रात्री बिबट्याने रोहिणी प्रशांत पाटील यांच्यावर हल्ला करून जखमी केले.
पाटील दाम्पत्य कळवण येथून घरी परतत होते. तेव्हा दबा धरून बसलेल्या बिबट्याने अचानक पाठीमागून झडप घालून रोहिणी पाटील यांच्यावर हल्ला केला. पाटील यांनी आरडाओरड केल्याने बिबट्याने धूम ठोकली.