मुंबई : पुणे चाकण येथील एमआयडीसीत १५ वर्षांपासून मर्सिडीज बेंझचा प्लांट आहे. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अध्यक्ष सिद्धेश कदम यांनी २३ ऑगस्ट रोजी प्लाटची पाहणी केली, त्यावेळी या प्लांटमध्ये नियमांचे उल्लंघन केल्याचे निदर्शनास आल्याचे एमपीसीबीने ट्विट केले आहे. मात्र प्लांटला नोटीस बजावली नसताना महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अध्यक्ष सिद्धेश कदम ३५ अधिकाऱ्यांचा लावाजामा घेऊन प्लांटची पाहाणी करण्यासाठी का गेले, विशेष म्हणजे अध्यक्षांना एमपीसीबीच्या कामाचा काय अनुभव असा सवाल विधान सभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी एक्सवर उपस्थित केला आहे.
महाराष्ट्र प्रदूषण मंडळाचे अध्यक्ष यांचा या क्षेत्रात अनुभव नसताना नियुक्ती केली. आता त्या पदावर बसून काम करण्याऐवजी नको ते उद्योग केल्याने महाराष्ट्रावर नामुष्की ओढवू शकते याची कल्पना तरी सिद्धेश कदम यांना आहे का, मर्सिडीज बेंझ यांना त्यांच्या प्लांट बाबत कोणतीही नोटीस बजावली नसताना अचानक पाहणी दौरा का, कोणत्याही पाहणीसाठी याबाबत तांत्रिक अनुभवी अधिकारी जातात पण, सिद्धेश कदम यांच्याबरोबर ३५ जण होते त्यातील फक्त चार सरकारी कर्मचारी अधिकारी होते, मग हे खासगी ३१ जण एखाद्या कंपनीच्या प्लांट मध्ये काय करत होते, असा सवाल त्यांनी एक्सवर उपस्थित केला आहे. वडेट्टीवार म्हणाले की, कंपनीच्या प्लांट मध्ये फोटोग्राफी करण्यास मनाई असताना सिद्धेश कदम हे तिथे का गेले असावेत.