
पुणे : सध्या आर्टीफिशियलचा जमाना आहे. त्याचा सगळीकडे बोलबाला पाहायला मिळत आहे. तंत्रज्ञान घोड्यासारखे असते. त्याला घाबरून चालणार नाही आणि नाकारून सुद्धा चालणार नाही. तंत्रज्ञानावर ठाण मांडून बसायचे आहे. तंत्रज्ञानाचा उपयोग प्रसार आणि प्रचारासाठी करून, मराठीला ज्ञान भाषेत परावर्तीत करण्याचा प्रयत्न करतोय,’ असे मत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी व्यक्त केले. दरम्यान, पुढच्या पाच वर्षांत एक विश्व मराठी संमेलन परदेशात घेऊन मराठीचा डंका वाजविण्यात येईल, असा विश्वास फडणवीस यांनी व्यक्त केला. कार्यक्रमात ज्येष्ठ साहित्यिक मधू मंगेश कर्णिक यांना 'साहित्य भूषण' पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
यावेळी फडणवीस म्हणाले, आज आपण एआयच्या युगात आहोत. वेबसाइटवर साहित्यिकांचे साहित्य उपलब्ध करून देण्याऐवजी स्मॉल लॅग्वेंज मॉडेल तयार करावे. चॅट जीपीटीला प्रश्न विचारतो, तसा एक प्रश्न या मॉडेला विचारल्यास संबंधित सर्व माहिती एका क्लिकवर मिळू शकेल. एआयचा उपयोग करून पुढच्या पिढी करता अभिजात साहित्य कसे पुढेघेऊन जाता येईल, याचा विचार करावा लागेल.
अजित पवार म्हणाले, "मराठी भाषेवर, मराठी साहित्यावर आणि मराठी संस्कृतीवर प्रेम करणारी, महाराष्ट्राच्या इतिहासाबद्दल स्वाभिमान बाळगणारी माणसे जगाच्या कानाकोपऱ्यातून या संमेलनासाठी आली. परदेशातूनही मराठी प्रेमी येथे आले आहेत. प्रत्येक जण आपापल्या परीने मराठी भाषेसाठी योगदान देत असतो." तसेच, दिल्लीतील मराठी शाळेला महाराष्ट्र सरकारकडून मदत केली जाईल, असे पवार यावेळी म्हणाले.
एकनाथ शिंदे म्हणाले, "मराठी भाषेला अडीच वर्षांपूर्वी अभिजात दर्जा मिळाला, हा राज्यातील जनतेच्या अस्मितेचा विषय आहे. आपल्या भाषेत उत्तम साहित्य निर्माण होते, हे आपण दाखवून दिले आहे. आम्ही राजकीय कार्यकर्ते, तसेच भाषेचेही कार्यकर्ते आहोत.
मालगुंड - ‘पुस्तकांचे गाव’ म्हणून घोषित करणार?
केशवसुत यांचे जन्मगाव मालगुंड मधू कर्णिक यांनी जागतिक स्तरावर पोहोचवले आहे. त्यामुळे मालगुंडला ‘पुस्तकांचे गाव’ म्हणून दर्जा देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय लवकरच घेतला जाईल, असे उदय सामंत यांनी जाहीर केले. तसेच राज्यातील इतरही गावांना त्यांच्या वैशिष्ट्यानुसार विशेषण देण्याचे धोरण आखले जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.
मराठी भाषा, माणसाला त्रास दिल्यास कठोर शासन- उदय सामंत
सांस्कृतिक नगरी असलेल्या पुण्यात अभिजात दर्जा मिळाल्यानंतर विश्व मराठी संमेलन होत आहे. मराठी भाषा विभागाचा कार्यक्रम पुणेकरांनी उचलून धरला आहे. मराठी ही शाळा-महाविद्यालयांपर्यंत पोहोचली पाहिजे. युवा पिढीची जबाबदारी आहे, की मराठी टिकविणे आणि आक्रमणाचा आक्रमकतेने प्रतिकार केला पाहिजे. पुढील वर्षी मालगुंड गावाला पुस्तकाच्या गावाचा दर्जा दिला जाईल. त्यासाठी निधी उपलब्ध करून दिला जाईल. प्रत्येक भाषकाचा आदर केला आहे. भाषेचा अनादर केलेला नाही. परंतु काही लोक जाणीवपूर्वक मराठी भाषा, माणसाला त्रास देण्याचे काम करत असतील, तर कठोर कायद्याद्वारे शासन झाले पाहिजे. मराठीचे अस्तित्व, अस्मिता टिकविण्याची कार्यवाही केली पाहिजे.