पत्नी-सासुशी भांडण; जावयाने चिमुकल्या मेहुण्याला ठार केले; जन्मठेपेची शिक्षा; कराडच्या अतिरिक्त सत्र न्यायालयाचा निकाल

पत्नी व सासुशी झालेल्या वादातून सात वर्षीय चिमुकल्या मेहुण्याचा पायरीवर डोके आपटून अत्यंत निर्घृण खून करणाऱ्या जावयास येथील जिल्हा व सत्र न्या. आण्णासाहेब पाटील यांनी सोमवारी जन्मठेपेची शिक्षा ठोठावली.
पत्नी-सासुशी भांडण; जावयाने चिमुकल्या मेहुण्याला ठार केले; जन्मठेपेची शिक्षा; कराडच्या अतिरिक्त सत्र न्यायालयाचा निकाल

कराड : पत्नी व सासुशी झालेल्या वादातून सात वर्षीय चिमुकल्या मेहुण्याचा पायरीवर डोके आपटून अत्यंत निर्घृण खून करणाऱ्या जावयास येथील जिल्हा व सत्र न्या. आण्णासाहेब पाटील यांनी सोमवारी जन्मठेपेची शिक्षा ठोठावली. पत्नी व सासूसोबत असलेल्या वादाच्या क्षुल्लक कारणावरून जावयाने हे निर्दयी कृत्य केल्याचे पोलीस तपासात समोर आले होते. सागर शंकर जाधव असे शिक्षा झालेल्याचे नाव आहे, तर रणजीत उर्फ निरंजन पवार (वय ७) खून झालेल्या चिमुरड्या मेहुण्याचे नाव आहे.

येथील शहराला लागूनच असलेल्या मलकापूर, ता. कराड येथील आगाशिवनगर येथील दांगट वस्तीत राहणारा सात वर्षीय रणजीत हा मुलगा १० ऑगस्ट २०१९ रोजी सायंकाळी अचानक गायब झाला. 'रात्री उशिरापर्यंत तो घरी परत न आल्यामुळे त्याची आई अनिता पवार यांनी त्याचा शोध सुरू केला. दांगट वस्तीत सर्वत्र शोध घेऊनही त्याचा ठावठिकाणा लागला नाही. अनिता पवार यांची विवाहित मुलगी सोनाली ही येथील शहरात खासगी नोकरी करत होती, ती रात्री साडेनऊ वाजण्याच्या सुमारास नोकरीच्या कामावरून घरी आली तेव्हा तिनेही रणजीतचा शोध घेतला; मात्र तो कोणालाच सापडला नाही. त्याची शोधाशोध सुरू असतानाच रात्री साडेदहा वा.च्या सुमारास डोंगरालगत असलेल्या दांगट वस्तीच्या संरक्षक भिंतीशेजारी रणजीत जखमी अवस्थेत आढळून आला होता. ही बाब लक्षात येताच त्याचे कुटुंबीय व नागरिकांनी त्याला कृष्णा रुग्णालयात दाखल करण्यासाठी आणले असता त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले.

याबाबत अनिता पवार यांनी कराड शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केल्यानंतर पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल केला होता. पोलिसांनी या गुन्ह्याचा तपास केला असता, सागर जाधव याने पत्नी सोनाली व सासू अनिता यांच्यासोबत असलेल्या वादाच्याकारणावरून मेहुणा रणजीतचा पायरीवर डोके आपटून खून केल्याचे समोर आले.

logo
marathi.freepressjournal.in