राज्यात काही दिवसांपासून पाऊस पुन्हा सक्रिय झाला आहे. राज्यातील अनेक भागात पावसाने दमदार हजेरी लावली आहे. विशेषतः मराठवाडा, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र या भागांत जोरदार पाऊस झाला आहे. आज अनंत चर्तुर्थी असल्याने राज्यभरात गणपती विसर्जनाची धामधूम असणार आहे. असं असताना आज अनेक जिल्ह्यांमध्ये हवामान खात्याने यलो अलर्ट जारी केला आहे. त्याच बरोबर राज्यतील ज्या दोन शहरात मोठ्या प्रमाणात गणेशोत्सव साजरा केला जातो. त्या पुणे आणि मुंबईतही आज मुसळधार पाऊस येण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.
त्याच बरोबर पश्चिम महाराष्ट्रात देखील मुसळधार पावसाची शक्यता दर्शवली जातं आहे. नगर, पुणे, नाशिक, सातारा, सांगली आणि सोलापूर जिल्ह्यांत देखील पावसाने परत एकदा हजेरी लावली आहे. नाशिकमध्ये देखील गेल्या सहा दिवसांपासून पावसाचं आगमन झालं आहे.
राज्यातील अनेक भागात सुरु असलेल्या पावसामुळे सखल भागात पाणी साचलं आहे. कोकणातील रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यांतही जोरदार पाऊस कोसळत आहे. बुधवारी चोवीस तासांत कोकणातील आंबोली येथे सर्वात जास्त ११७.८ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. कोकणात असाच पाऊस चालू राहिला तर लोंब्या आलेलं भात पीक पडून जाण्याची भीती व्यक्त केली जातं आहे.