अनुवादातून भाषाज्ञान समृद्ध; ‘अनुवाद मराठीतून’ परिसंवादात तज्ज्ञांचे मत

अनुवाद करणे ही सांस्कृतिक प्रक्रिया आहे, पण अनुवादाला आज दुय्यम स्थान दिले जाते. अनुवादामुळे भाषाज्ञान समृद्ध होते.
अनुवादातून भाषाज्ञान समृद्ध; ‘अनुवाद मराठीतून’ परिसंवादात तज्ज्ञांचे मत
Published on

राकेश मोरे / नवी दिल्ली

अनुवाद करणे ही सांस्कृतिक प्रक्रिया आहे, पण अनुवादाला आज दुय्यम स्थान दिले जाते. अनुवादामुळे भाषाज्ञान समृद्ध होते. भाषांतर करताना सहित्यामधील मर्म किंवा भाव अनुवादित करणे सोपे नसते. भाषांतर करताना नवनवीन शब्दांचा वापर व्हावा, असे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले.

अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या सरहद, पुणे आयोजित ९८व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात ‌‘अनुवाद मराठीतून इतर भाषेत किंवा इतर भाषेतून मराठीत‌’ या विषयावर रविवारी परिसंवाद आयोजित करण्यात आला होता. यशवंतराव चव्हाण सभामंडपातील लोकशाहीर अण्णा भाऊ साठे मंचावर आयोजित चर्चासत्रात प्रफुल्ल शिलेदार अध्यक्षस्थानी होते. डॉ पृथ्वीराज तौर, सुनीता डागा, दीपक बोरगावे, विजय नाईक, महामंडळ प्रतिनिधी किरण सागर यांचा या कार्यक्रमात सहभाग होता.

साहित्यकृतीचा अनुवाद करताना शब्दांची योग्य निवड करणे महत्त्वाचे ठरते. भाषांतरात क्लिष्टता न आणता वाचकांना समजेल अशा पद्धतीने अनुवाद होणे आवश्यक आहे. उत्तम अनुवादित साहित्य जगभरात पोहोचण्यासाठी या गोष्टींचा विचार होणे गरजेचे आहे, असे मत विजय नाईक यांनी व्यक्त केले.

दीपक बोरगावे म्हणाले की, अनुवाद ही संस्कृती संक्रमणाची बाब आहे. अनुवाद करणे अवघड असले तरी ती निरंतर चालणारी प्रक्रिया आहे. आज अनुवादित साहित्यकृतींना दुय्यम समजले जाते. अनुवादाबाबत नेमके मॉडेल तयार करण्याची गरज आहे.

सुनीता डागा म्हणाल्या की, साहित्यकृती विश्वव्यापी होण्यात अनुवादित साहित्याचा मोठा वाटा आहे. अनुवादकाला भाषेची जाण असणे आवश्यक आहे.

संमेलनात अनुवादित साहित्यावर चर्चा आवश्यक

परिसंवादाचा समारोप करताना प्रफुल्ल शिलेदार म्हणाले की, प्रत्येक संमेलनात अनुवादित साहित्य या विषयावर चर्चा होणे तसेच अनुवादाच्या क्षेत्राकडे गांभीर्याने पाहिले गेले पाहिजे. अनुवादित साहित्यासंदर्भात शासकीय स्तरावरही स्वतंत्र मंडळ व समिती तयार व्हायला हवी.

logo
marathi.freepressjournal.in