प्रतिनिधी/मुंबई: भाजपने लोकसभा निवडणुकीसाठी केंद्रीय निवडणूक आयोगाला सादर केलेल्या पक्षाच्या स्टार प्रचारकांच्या यादीत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह शिवसेना शिंदे गटाचे मुख्य नेते आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार तसेच रिपब्लिकन पक्षाचे रामदास आठवले यांचा समावेश केला आहे. शिंदे आणि पवार हे भाजपच्या उमेदवारांचा प्रचार करतील, असे भाजपने आयोगाला दिलेल्या पत्रात म्हटले आहे. भाजपच्या स्टार प्रचारकांच्या यादीत घटक पक्षाच्या नेत्यांचा समावेश करण्यात आला आहे.
भाजपने मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांना महाराष्ट्रातील लोकसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी स्टार प्रचारकांची यादी दिली आहे. या यादीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह भाजपच्या वरिष्ठ नेत्यांचा समावेश आहे. याशिवाय भाजपने आपल्या यादीत एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांचा समावेश केला आहे. एखाद्या राष्ट्रीय पक्षाने आपल्या यादीत अन्य पक्षातील नेत्यांचा समावेश करण्याची ही पहिलीच वेळ आहे.
दरम्यान, भाजपच्या स्टार प्रचारकांच्या यादीत राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी, नड्डा, केंद्रीय मंत्री राजनाथ सिंह, अमित शहा, नितीन गडकरी, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत, मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री मोहन यादव, राजस्थानचे मुख्यमंत्री भजनलाल शर्मा, नारायण राणे, अनुराग ठाकूर, ज्योतिरादित्य शिंदे, स्मृती इराणी, रावसाहेब दानवे, शिवराज चौहान, सम्राट चौधरी, अशोक चव्हाण, विनोद तावडे, चंद्रशेखर बावनकुळे, आशीष शेलार, चंद्रकांत पाटील, पंकजा मुंडे, राधाकृष्ण विखे पाटील, पीयूष गोयल, गिरीश महाजन, रवींद्र चव्हाण, अमर साबळे, डॉ. विजयकुमार गावित, अतुल सावे, धनंजय पाटील आदींचा समावेश आहे.