
मुंबई : नागपूरमधील हिवाळी अधिवेशनाआधी खातेवाटप करण्यात आल्यानंतर महायुतीतील मंत्र्यांना आता पालकमंत्रिपदाची आस लागली होती. पण जवळपास महिना उलटला तरी पालकमंत्री जाहीर करण्यात आले नसल्याने मंत्र्यांमध्ये अस्वस्थता पसरली आहे. कोणत्याही क्षणी पालकमंत्र्यांची घोषणा होणार असल्यामुळे शिंदेंच्या शिवसेनेतील कॅबिनेट मंत्र्यांनी आता पालकमंत्रिपदासाठी लॉबिंग सुरू केली आहे.
पहिल्यांदाच मंत्रिपदाची माळ गळ्यात पडल्यानंतर भरत गोगावले यांनी रायगडच्या पालकमंत्रिपदावर दावा ठोकला आहे. गुलाबराव पाटील हेसुद्धा आपणच जळगावचे पालकमंत्री असू, असे ठामपणे सांगत आहे. एकीकडे जिल्ह्याला पालकमंत्रीच नसल्यामुळे प्रजासत्ताक दिनी पालकमंत्र्यांविनाच ध्वजारोहणाचा कार्यक्रम करावा लागणार, अशी स्थिती सर्वच जिल्ह्यांमध्ये आहे.
महायुतीत पालकमंत्रिपदासाठी धुसफूस सुरू असल्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जिल्ह्यांचे पालकमंत्री जाहीर करणे लांबवले आहे. महायुतीतील तीन घटक पक्षांमधील अनेक मंत्र्यांना पालकमंत्रिपदाची स्वप्ने पडू लागली असून काहींनी आपणच पालकमंत्री असू, अशा थाटात वावरणे आणि जाहीर कबुली देणे सुरू केले आहे. प्रजासत्ताक दिन अवघ्या १२ दिवसांवर येऊन ठेपला असतानाच, जिल्ह्याला पालकमंत्री नसल्यामुळे ध्वजारोहणाचा कार्यक्रम कुणाच्या हस्ते करायचा, असा प्रश्न जिल्हाधिकाऱ्यांना पडला आहे. त्यातच मुख्यमंत्री फडणवीस आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी लवकरच पालकमंत्री जाहीर करू, असे आश्वासन दिले आहे.
महायुती सरकार येऊन दोन महिने उलटले असून मंत्रिमंडळाचा विस्तार होऊनही जवळपास एक महिना होत आला आहे, तरी अद्याप पालकमंत्र्यांच्या नियुक्त्या झालेल्या नाहीत. यावरून महायुतीमध्ये रस्सीखेच आणि आपांपसात तीव्र स्पर्धा सुरू असल्याचे दिसून येते. याच कारणामुळे पालकमंत्र्यांच्या नियुक्त्या रखडल्या आहेत.
"येत्या दोन ते तीन दिवसांत पालकमंत्रिपदाचा विषय सुटलेला असेल. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत आमच्या आतापर्यंत दोन ते तीन बैठका झाल्या आहेत. कोणाला कुठल्या जिल्ह्यात नियुक्त करायचे, याचा निर्णय अंतिम टप्प्यात आहे. त्यामुळे २६ जानेवारीला ध्वजारोहण कोणी करायचे, हा प्रश्न सुटलेला असेल, असे भाजपचे प्रदेशाध्यक्ष आणि महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले.