
नाशिक : गेल्या तीन वर्षांपासून राज्यातील रखडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका कधी होणार, याची सर्वांनाच उत्सुकता आहे. सर्व पक्षांनी या निवडणुकांची जय्यत तयारी सुरू केली आहे. या पार्श्वभूमीवर राज्यातील महानगरपलिका, जिल्हा परिषद, पंचायत समिती व नगरपालिकेच्या निवडणुका टप्प्याटप्प्याने होणार असून या निवडणुकांचा बार दिवाळीनंतरच उडणार असल्याचे राज्य निवडणूक आयोगाचे आयुक्त दिनेश वाघमारे यांनी मंगळवारी स्पष्ट केले. ऑक्टोबर महिन्याच्या अखेरीस निवडणुकीच्या प्रक्रियेला सुरुवात होणार असल्यामुळे डिसेंबर किंवा जानेवारी महिन्यात महापालिकेच्या निवडणुका होतील, असे त्यांनी स्पष्ट केले.
आगामी निवडणुकीचा आढावा घेण्यासाठी नाशिकसह उत्तर महाराष्ट्रातील प्रशासकीय अधिकाऱ्यांसोबत बैठक घेण्यात आली. या बैठकीनंतर निवडणूक आयुक्तांनी पत्रकार परिषद घेत निवडणूकपूर्व तयारीची माहिती दिली. राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे म्हणाले की, “४ महिन्यांच्या आत निवडणुका घेण्याचे आदेश सुप्रीम कोर्टाने दिले आहेत. त्यानुसार मनपा, जिल्हा परिषद, नगरपालिका अशा सर्व निवडणुकांचा कार्यक्रम टप्प्याटप्प्याने घेण्यात येईल. नाशिकमध्ये ५० लाख ४५ हजार मतदार असून ४,९८२ केंद्रे आहेत. यासाठी ८ हजार ७०५ कंट्रोल युनिट्स लागणार असून १७ हजारांपेक्षा अधिक मतदान यंत्रांची आवश्यकता आहे. सर्व निवडणुका एकत्र घेतल्यास मनुष्यबळाची मोठी अडचण येणार आहे. त्यामुळे निवडणुका टप्प्याटप्प्याने घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.” “१ जुलै २०२५ नुसार मतदार यादी आहे, ती ग्राह्य धरली जाणार आहे. आता प्रारूप प्रभाग रचनानुसार पुढील कार्यवाही केली जाणार आहे,” अशी माहिती राज्य निवडणूक आयोगाचे आयुक्त दिनेश वाघमारे यांनी दिली.
ते म्हणाले की, “ओबीसी आरक्षणासाठी लॉटरी पद्धत अवलंबण्यात येणार आहे. अनुसूचित जाती व अनुसूचित जमातीसाठी आरक्षण निश्चित असते. पण ओबीसी आरक्षणासाठी सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानुसार लॉटरी पद्धत अवलंबली जाणार आहे. मागील निवडणुकांतही ओबीसी आरक्षण होते. त्यावेळीही हेच तत्त्व पाळण्यात आले होते. यंदाही त्याची अंमलबजावणी केली जाईल.”
‘व्हीव्हीपॅट मशीन’चा वापर होणार नाही
आगामी निवडणुकीत ‘व्हीव्हीपॅट मशीन’चा वापर होणार नसल्याचेही राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी स्पष्ट केले. त्यामुळे या निवडणुका ईव्हीएम मशीनवरच घेण्यात येतील, हे स्पष्ट झाले आहे. लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुकीत विरोधी पक्षांनी ईव्हीएममध्ये मोठा घोटाळा झाल्याचा आरोप केला होता. याप्रकरणी त्यांनी ईव्हीएम व ‘व्हीव्हीपॅट’मधील मतांची जुळवणी करण्याचीही मागणी केली होती. त्यातच आता आयोगाने स्थानिक निवडणुकीत व्हीव्हीपॅटचा वापर न करण्याचा निर्णय घेतल्यामुळे याप्रकरणी मोठा वाद उत्पन्न होण्याची शक्यता आहे.
मुंबईमध्ये जुन्याच प्रभागानुसार निवडणुका
मुंबईमध्ये जुन्याच प्रभागानुसार निवडणुका होणार आहेत. त्यानुसार मुंबई महानगरपालिकेमध्ये २२७ एकसदस्यीय प्रभाग रचना करण्यात येणार आहेत, तर पुणे, नागपूर, ठाणे, नाशिक, नवी मुंबई, पिंपरी चिंचवड, छत्रपती संभाजीनगर यांसह इतर सर्व महापालिकांमध्ये चार सदस्यांचे प्रभाग असणार आहेत. मुंबईमध्ये आधीही २२७ प्रभाग होते. महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर त्यामध्ये वाढ होऊन २३६ प्रभाग करण्यात आले होते. पुन्हा महायुती सरकार सत्तेत आल्यानंतर २२७ प्रभाग करण्यात आले. त्याला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले असताना, ती याचिका फेटाळण्यात आली.