

मुंबई/रायगड/नाशिक : जवळपास अनेक वर्षांनी होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी मतदारांमधील उत्साह शिगेला पोहाचलेला असतानाच, बहुतेक ठिकाणी सत्ताधारी पक्षाच्याच कार्यकर्त्यांमध्ये धुमश्चक्री पाहायला मिळाली. राज्यातील २६२ नगरपरिषदा आणि नगरपंचायतींच्या अध्यक्षपदासाठी आणि ६०४२ सदस्यपदांच्या जागांसाठी मंगळवारी मतदान पार पडले. मतदानाची वेळ संपली तरीदेखील राज्यातील अनेक केंद्रांवर मतदारांच्या लांबचलांब रांगा दिसून आल्या. अनेक ठिकाणी राडा झाल्यामुळे या निवडणुकीला वादाचे गालबोट लागले. आता सर्वांचे लक्ष २१ डिसेंबरच्या निकालाकडे लागले आहे. रायगड जिल्ह्यातील महाड नगरपरिषदेच्या निवडणुकीत मतदानाच्या वेळी प्रभाग क्रमांक २ आणि ३च्या मतदान केंद्राबाहेर शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये जोरदार हाणामारी होऊन राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांच्या गाड्या फोडण्यापर्यंत परिस्थिती चिघळळी होती. त्याचबरोबर रोहा नगरपरिषद निवडणुकीदरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजप कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी झाली.
मुक्ताईनगर नगरपंचायत आणि नगरपरिषद निवडणुकीमध्ये भाजपच्या खासदार रक्षा खडसे आणि शिवसेनेचे आमदार चंद्रकांत पाटील एकमेकांसमोर आले असताना, शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांकडून भाजप कार्यकर्त्यांना मारहाण केल्याचा दावा केला जात आहे. मात्र बोगस मतदार आणल्याचा आरोप शिवसेना शिंदे गटाचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी केला आहे. याप्रकरणी रक्षा खडसे यांनी पोलीस ठाण्यात धाव घेतली होती.
येवला नगरपरिषद निवडणुकीच्या मतदानादरम्यान शिंदे गटाचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार रुपेश दराडे यांच्या कार्यकर्त्याला मतदान केंद्राजवळ पाकिटातून पैसे वाटताना संतप्त नागरिकांनी रंगेहाथ पकडले. यावेळी जमावाने संबंधित कार्यकर्त्याला बेदम चोप देत पोलिसांच्या स्वाधीन केले. नाशिकमधील सिन्नरमध्ये अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे उमेदवार किरण गोजरे यांच्यावर स्प्रेने हल्ला करण्यात आला. तसेच येवल्यात सहस्रार्जुन मंगल कार्यालय मतदान केंद्राबाहेर राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) आणि शिवसेना (शिंदे गट) समर्थकांमध्ये झालेल्या वादातूनही राडा उसळला. मतदान केंद्रात ये-जा करण्यावरून झालेल्या बाचाबाचीचे रूपांतर थेट हाणामारीत झाले. पोलिसांनी मध्यस्थी करून दोन्ही गटातील कार्यकर्त्यांना पांगवले
तुळजापुरात मतदानासाठी आलेल्या महिलेचा मृत्यू
तुळजापूर नगर परिषदेच्या प्रभाग क्रमांक-९ मधील एका बुथवर मतदान करण्यासाठी आलेल्या एका महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाला. राजश्री सदाशिव भोसले असे या महिलेचे नाव असून हृदयविकाराच्या झटक्यामुळे त्यांचा मृत्यू झाला.
चंद्रपूरात ईव्हीएम फोडले
चंद्रपुरातील गडचांदूर येथे मतदानादरम्यान एका मतदाराने ‘नगारा’ चिन्ह दाबल्यानंतर ‘कमळ’ चिन्हासमोर लाल लाईट पेटल्याने राम दुर्गे याने रागाच्या भरात ईव्हीएम मशीन फोडल्याची घटना घडली. प्रभाग क्रमांक 9 मधील आदर्श हिंदी सेमी इंग्लिश प्राथमिक विद्यालय येथील मतदान केंद्रावर हा प्रकार घडल्यानंतर पोलिसांनी राम दुर्गेला ताब्यात घेतले.