कराड : महाबळेश्वर सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अजब कारभारामुळे स्थानिकांना त्रास, मात्र ठेकेदाराला अभय दिले जात असून चुकीच्या नोटीस देऊन स्थानिकांनाच खराब रस्त्यासाठी जबाबदार ठरवले जात आहे.
महाबळेश्वर हे सध्या जागतिक दर्जाचे पर्यटनस्थळ म्हणून प्रसिद्ध होत आहे. येथील निसर्ग संपदेच्या जिवावर पर्यटक येथे वारंवार फिरायला येत असतात. अनेक वर्षे पिढ्यान्पिढ्या आजही वर्षातून एकदा का होईना पर्यटक येथे पर्यटनासाठी आवर्जून येताना दिसत असतात. मात्र, येथील प्रशासन मात्र चांगल्या सोयीसुविधा देण्यास नेहमीच उदासीन दिसत होते. प्रशासन रस्ते दुरुस्तीपेक्षा खराब करण्यातच धन्यता मानत आहेत. येथील स्थानिकांना पर्यटन वाढीसाठी शासनस्तरावरून मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध होत आहे. परंतु त्याचा उपयोग होताना दिसत नाही, उलट तालुक्यातील रस्त्यांची दैयनीय अवस्था पाहून हेच का ते जागतिक स्थानावर प्रसिद्धी मिळवत असलेले पर्यटनस्थळ? असा प्रश्न पडत आहे.
नुकताच येथे उन्हाळी हंगामा अगोदर महाबळेश्वर पाचगणी, आंबेनळी घाट व तापोळा रस्ता युद्धपातळीवर करण्यात आले. परंतु दुर्दैवाने पहिल्याच पावसात या रस्त्यांची दुरवस्था झाली. नुसती दुरवस्थाच नाही तर रस्त्याच्या कामामध्ये डांबर वापरले होते का नाही? असा प्रश्नच येथे उपस्थित केला जात आहे. याबाबत संतप्त नागरिकांनी सा. बां. खात्याच्या अधिकाऱ्यांना धारेवर धरले होते तर अनेक संघटनांनी भरपावसात आंदोलन करत निवेदने देखील दिली होती. तसेच ठेकेदारावर कडक कारवाई करत काळ्या यादीत टाकण्याची आग्रही मागणी करण्यात आली होती.
या संदर्भात सा.बां खात्याने आंदोलनावेळी नरम भूमिका घेत आंदोलकांच्या मागण्या मान्य केल्या. परंतु ठेकेदाराला वाचविण्यासाठी नविनच युक्ती काढत रस्ते खराब होण्यामागे येथील स्थानिक व्यावसायिकांनाच दोषी ठरवत नविनच शोध लावल्यामुळे शहरातून सा. बां. खात्याच्या कारभाराबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केला जात आहे.
सा.बां विभागाचे काम दर्जेदार नसून चोर सोडून संन्याशाला फाशी देण्याचा प्रकार सध्या सुरू आहे. वास्तविक पाहता पाचगणी रोडवरती एका बाजूला गटार तर दुसऱ्या बाजूला उतार असल्याने आजतागायत येथे गटार नसल्याने रस्ते खराब होत असल्याचा शोध सा.बां खात्याने लावला आहे. ठेकेदार व खात्याची मिलीभगत यामधून स्पष्ट दिसून येत आहे. वास्तविक पाहता सर्वच ठिकाणी रस्ते वाहून गेल्याचे स्पष्ट दिसून येत असताना व्यावसायिकांमुळे रस्ते खराब झाले हे सा.बां चे विधान साफ खोटे व दिशाभूल करणारे आहे. - अतुल सलागरे, व्यावसायिक,महाबळेश्वर.
पूर्वी वेण्णा लेकच्या पुढे गहू गेरवा परिसरात मोठ्या प्रमाणात रस्त्यावर पाण्याचे तळे साचायचे तर, तेथील ओढ्यातील पाणी देखील रस्त्यांवरून वाहून वाहतूक बंद होत असे परंतु नवीन पूल झाल्याने पाणी रस्त्यावर साचायचे बंद झाले तरी पहिल्या पावसात रस्ते वाहून गेले. असे असताना ठेकेदाराला वाचविण्यासाठी सा.बां विभागाचा जावई शोध हास्यास्पद आहे तर हे अधिकारी व त्यांचे सुपरव्हायझर काम सुरू असताना कुठे होते? हा प्रश्न उपस्थित होत आहे. - ॲड. संजय जंगम, माजी सभापती, महाबळेश्वर पंचायत समिती.