

पुणे : पुणे जिल्ह्यातील लोहगड किल्ल्यावर फिरण्यासाठी गेलेल्या २५ वर्षीय केतन विशाल अगरवाल मृत्यू म्हणजे केतनची होणारी पत्नी सिया प्रविण गोयल हिने आपल्या प्रियकराच्या मदतीने केलेला 'मर्डर' असल्याचे उघड झाले.
केतनचा पाय घसरून तो दरीत पडल्याने मृत्यू झाल्याची घटना सुरुवातीला एक दुर्दैवी अपघात वाटत होती. मात्र, पुणे ग्रामीण पोलिसांनी केलेल्या सखोल तपासात या घटनेमागील एक अत्यंत धक्कादायक आणि थरारक वास्तव समोर आले आहे. हा मृत्यू अपघात नसून थंड डोक्याने केलेला खून आहे हे उघड झाले आहे. या प्रकरणी लोणावळा ग्रामीण पोलिसांनी कलम १०३ आणि ६१(२) अंतर्गत खुनाचा गुन्हा दाखल करून सिया गोयल आणि चेतन चौधरी या दोघांनाही अटक केली आहे.
मृत केतन अगरवाल हा पुण्यातील एका प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिकाचा मुलगा होता. परदेशातून उच्च शिक्षण पूर्ण करून तो नुकताच वडिलांच्या व्यवसायात रुजू झाला होता. सिया गोयल हिच्यासोबत १९ फेब्रुवारी रोजी त्याचा साखरपुडा झाला होता आणि नोव्हेंबर महिन्यात त्यांचा विवाह जयपूरमधील एका भव्य पॅलेसमध्ये पार पडणार होता.
या शाही विवाहासाठी १७ कोटी रुपये खर्च करण्यात येणार होता व व्हीआयपी पाहुण्यांसाठी दोन खाजगी विमानेही बुक करण्यात आली होती, अशी माहिती आता पुढे आली आहे. मात्र, केतनचे वडील विशाल अगरवाल यांनी लग्नाचे ठिकाण अद्याप ठरले नसल्याचे सांगत विमाने आणि पॅलेसच्या काही गोष्टी काल्पनिक असल्याचे नमूद केले आहे.
पुण्यातील एका नामांकित महाविद्यालयात शिकत असताना सिया गोयल हिचे चेतन बाबूलाल चौधरी नावाच्या तरुणासोबत प्रेमसंबंध जुळले होते. केतनसोबत लग्न करण्याची सियाची मुळीच इच्छा नव्हती आणि केतन त्यांच्या प्रेमात अडसर ठरत होता. त्यामुळे या दोघांनी केतनचा काटा काढण्याचे ठरवले. हत्येचा हा प्रयत्न त्यांनी यापूर्वीही केला होता. जूनच्या पहिल्या आठवड्यात जेव्हा केतन आणि सिया प्री-वेडिंग शूटसाठी बालीला जाणार होते, तेव्हा सियाने स्वतःच केतनचा पासपोर्ट चोरून लपवून ठेवला, जेणेकरून तो दौरा रद्द व्हावा. इतकेच नव्हे तर, गेल्या २० दिवसांत सियाने केतनला तब्बल तीन वेळा लोहगडावर नेले होते. सियाचे केतनशी लग्न ठरले होते, मात्र तिची या लग्नाची अजिबात इच्छा नव्हती. तिला चेतनसोबतच राहायचे होते. त्यातूनच सिया आणि चेतनने मिळून केतनला वाटेतून हटवण्याचा अत्यंत भयानक कट रचला,’ अशी माहिती पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीप सिंग गिल यांनी पत्रकार परिषदेत दिली.
भर उन्हात 'हुडी' घातल्याने पोलिसांना शंका
दरम्यान, घटनेची गंभीरता ओळखून पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल यांनी स्थानिक गुन्हे शाखेला समांतर तपासाचे आदेश दिले होते. भर उन्हात 'हुडी' घालून फिरणाऱ्या त्या संशयित तरुणाने पोलिसांच्या मनात शंका निर्माण केली होती. सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली असता, सिया आणि चेतन यांच्यातील संशयास्पद हालचाली आणि इशारे पोलिसांच्या नजरेत आले. तांत्रिक पुराव्यांच्या (सीडीआर, आयपीडीआर ॲनालिसिस) आधारे पोलिसांनी चेतन चौधरीला ताब्यात घेतले आणि त्याने गुन्ह्याची कबुली दिली.
फोटोच्या बहाण्याने खोल दरीत ढकलले
सियाचा वाढदिवस साजरा करण्याच्या बहाण्याने १८ जून २०२६ रोजी ती केतनला घेऊन लोहगड किल्ल्यावर गेली. कटानुसार तिचा प्रियकर चेतन चौधरी हा देखील तिथे पोहोचला होता. स्वतःची ओळख लपवण्यासाठी चेतनने भर उन्हात अंगात जाड 'हुडी' (जॅकेट) घातली होती आणि कानात हेडफोन लावले होते. तसेच त्याने स्वतःचा फोन न आणता एका कामगाराचा फोन वापरला होता. दुपारी दीडच्या सुमारास, किल्ल्याच्या पश्चिम बाजूला एका निर्जन कड्यावर फोटोसाठी पोज देत असताना, सिया आणि चेतनने संधी साधून केतनला ४०० फूट खोल दरीत ढकलून दिले. त्यानंतर सियाने केतनचा पाय घसरल्याचा बनाव रचून पोलिसांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केल्याचे तपासात निष्पन्न झाले.